आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर केलेल्या वक्तव्याचा काही प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला आहे. असे भारतीय संघाचा माजी फलंदाज राहुल द्रविडने स्पष्ट केले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेली समिती अवैध ठरवत उच्च न्यायालयाने बीसीसीआयला फटकारले होते. यामुद्दयावरुन द्रविडने, क्रिकेटची विश्वासार्हता टिकवणे महत्वाचे आहे. असे झाले नाही, तर क्रिकेटरसिकांच्या मनातून क्रिकेटपटूंचा आदर कमी होईल असे म्हटले असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. यावर नाराज होऊन माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे द्रविडने स्पष्ट केले आहे.
“फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेटपटूंचे नाव वृत्तपत्राच्या शेवटच्या पानावर(क्रिडा पान) येण्याऐवजी पहिल्या पानावर येते. ही क्रिकेट विश्वासाठी अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. जगभरात क्रिकेट खेळावर प्रेम करणारे अनेक चाहते आहेत. चाहते आहेत म्हणून क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे आम्ही काय करतो? यावर चाहते, क्रिकेट, क्रिकेटमंडळ आणि शासनसुद्धा यासर्वांची विश्वासार्हता टिकून असते. त्यामुळे प्रत्येकाने याचे भान राखायला हवे” असेही द्रविड म्हणाला होता.