भारतीय संघातून सध्या बाहेर असलेला माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आपल्या क्रिकेट कारकिर्दीची नव्याने सुरुवात करण्याच्या विचारात आहे. गेली काही वर्ष स्थानिक क्रिकेटमध्ये बडोद्याच्या संघाकडून खेळणारा इरफान आगामी ३ वर्षांसाठी जम्मू-काश्मिरकडून खेळताना दिसू शकतो. जम्मू-काश्मिर क्रिकेट असोसिएशनचे विशेष कार्यकारी अधिकारी आशिक अली बुखारी यांनी, आपण या विषयी इरफान पठाणशी चर्चाही केल्याचं मान्य केलं आहे. याव्यतिरीक्त भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनाही जम्मू काश्मिरच्या प्रशिक्षकपदाची ऑफर देण्यात आलेली आहे.

“आमच्या संघासाठी आम्ही अष्टपैलू खेळाडूंच्या शोघात होतो आणि यासाठी इरफान पठाणला आमची पहिली पसंती होती. आंतरराष्ट्रीय आणि प्रथमश्रेणी सामन्यांकडे इरफानचा अनुभव पाहता तो आमच्या संघाला वर काढण्यात मदत करु शकतो. इरफानच्या सोबतीने इतर खेळाडूंच्या खेळातही सुधारणा होईल.” याच कारणासाठी आम्ही इरफान पठाणला जम्मू-काश्मिरकडून खेळवण्यासाठी उत्सुक आहोत, बुखारी यांनी इंडियन एक्स्प्रेस दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.

इरफान पठाणनेही आपल्याला जम्मू-काश्मिरकडून खेळण्याची संधी आल्यचं मान्य केलं आहे. जम्मू-काश्मिरकडून खेळण्यासाठी मी बडोदा क्रिकेट असोसिएशनचं ना हरकत प्रमाणपत्रही मिळवलं आहे. त्यामुळे यासंदर्भातला अंतिम निर्णय आगामी २-३ दिवसांमध्ये आपण घेणार असल्याचं इरफान पठाणने स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत इरफान पठाणने २९ कसोटी सामने, आणि १२० वन-डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.