इंग्लडचा अष्टपैलू क्रिकेटर मोईन अली याने क्रिकेट खेळापेक्षा इस्लाम धर्म अधिक प्रिय असल्याचे वक्तव्य केले आहे. इस्लाम जीवन जगण्याचे स्वातंत्र्य देणारा धर्म असल्याचे सांगत वेळ पडल्यास धर्मासाठी  क्रिकेट देखील सोडू शकतो, असे मोईन अलीने म्हटले आहे. इंग्लडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानात उतरताना, इंग्लंडच्या जनतेसोबतच मुस्लीमांचे देखील प्रतिनिधित्व करत असल्याची भावना बाळगतो, असेही मोईन अलीने उघडपणे सांगितले. क्रिकेटला इस्लामपेक्षा कमी महत्त्व असल्यामुळे ज्यावेळी मी क्रिकेटला रामराम केरेल, त्यावेळी मला फारसा त्रास होणार नसल्याचे मोईन अली यावेळी म्हणाला. मोईन अली इंग्लडकडून २६ कसोटी आणि ३९ एकदिवसीय सामने खेळला असून कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात मोईन अलीने  प्रत्येकी एक शतक ठोकले आहे. फलंदाजी सोबतच मोईनच्या फिरकी गोलंदाजीमध्येही विरोधी संघाला हैराण करण्याची किमया आहे. इंग्लडच्या उजव्या हाताच्या फिरकी गोलंदाजाने आतापर्यंत कसोटीमध्ये  ६६ आणि  एकदिवसीय सामन्यामध्ये ३९ बळी टिपले आहेत. मागील दोन वर्षापासून मोईन अली इंग्लडच्या संघामध्ये आपले स्थान कायम ठेवण्यात सफल ठरला आहे. सध्या पाकिस्तान विरुद्ध सुरु असणाऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात मोईन अली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे.