दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे अखेरचे दोन एकदिवसीय सामने आणि पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीची बैठक सोमवारी राजधानीत होणार आहे. या बैठकीत वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या अनुपस्थितीत गोलंदाजीच्या माऱ्याचा समतोल साधण्याची महत्त्वाची जबाबदारी असेल.
उर्वरित एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात आश्चर्यकारक बदल दिसून येण्याची शक्यता कमी आहे. मात्र रविचंद्रन अश्विनच्या दुखापतीचे स्वरूप पाहून निर्णय घेण्यात येईल. मात्र हरयाणाविरुद्धच्या रणजी सामन्यात इशांतला दुखापत झाल्यामुळे कसोटी मालिकेसाठी गोलंदाज निवडताना मात्र निवड समितीची कठीण परीक्षा असेल.
मोहाली आणि बंगळुरू येथे होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ असा विजय मिळवणाराच १५ सदस्यीय भारतीय संघ कायम असेल. मुरली विजय, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांच्यावर फलंदाजीची मदार असेल. राखीव फलंदाज म्हणून के. एल. राहुलचा पर्याय आहे. दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धची अखेरची कसोटी खेळू न शकलेला वृद्धिमान साहा संघात परतण्याची शक्यता आहे. नमन ओझासुद्धा संघात स्थान मिळवण्यासाठी उत्सुक आहे. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, वरुण आरोन हे तीन वेगवान गोलंदाज असतील, अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीलाही संधी मिळू शकेल. अश्विन कसोटी मालिकेसाठी तंदुरुस्त होऊ शकला नाही, तर रवींद्र जडेजाला संघात स्थान मिळवणे कठीण जाणार नाही. त्याने सौराष्ट्राकडून खेळताना दोन रणजी सामन्यांत २४ बळी मिळवले आहेत. हरभजन सिंग आणि अमित मिश्रा स्थान टिकवण्यात यशस्वी होऊ शकतील.