देशांतर्गत सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केल्याप्रकरणी वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनवर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघटनेने कारवाई केली आहे. येत्या आठवडय़ात सुरू होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याला संघातून निलंबित करण्यात आले आहे.

गेल्या आठवडय़ात शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेत क्वीन्सलँडविरुद्धच्या सामन्यात व्हिक्टोरिया संघाचे प्रतिनिधित्व करताना पॅटिन्सनने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले. पॅटिन्सन कॅमेरून गेनॉनला नेमके काय म्हणाला, हे स्पष्ट होऊ  शकलेले नाही. मात्र क्षेत्ररक्षण करताना त्याने समलैंगितेबाबत आक्षेपार्ह टिपण्णी केल्याचे स्पष्ट झाले आहे, असे संघटनेने सांगितले. गेल्या १८ महिन्यांत पॅटिन्सनने तिसऱ्यांदा आचारसंहितेचं उल्लंघन केल्यामुळे त्याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.

पॅटिन्सनच्या बंदीमुळे पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मिचेल स्टार्कचा खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जोश हॅझलवूड, पॅट कमिन्स आणि नॅथन लायन या गोलंदाजांचे संघातील स्थान नक्की आहे.

‘‘गेल्या वर्षी चेंडू फेरफार प्रकरणी स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांच्यावर बंदीची कारवाई झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटची डागाळलेली प्रतिमा सावरण्यासाठी आमचे सांघिक प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पॅटिन्सनचे वागणे हे निराशाजनक आहे,’’ असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने व्यक्त केले आहे.