जोस बेअरस्टोचे नाबाद शतक आणि कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकच्या (८५) दमदार फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ६ बाद २७९ अशी मजल मारली. खेळ थांबला, तेव्हा बेअरस्टो १०७ आणि ख्रिस वोक्स २३ धावांवर खेळत होते.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करल्यावर कुकने अ‍ॅलेक्स हेल्स (१८) सोबत ५६ धावांची दमदार सलामी नोंदवली. मग निक कॉम्पटन (१), जो रूटला (३) व जेम्स व्हिन्से (१०) लवकर माघारी परतले. त्यामुळे इंग्लंडची ४ बाद ८४ अशी अवस्था झाली. पण कुकने बेअरस्टोसोबत पाचव्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी रचून संघाचा डाव सावरला. शतकाकडे कूच करणाऱ्या कुकला नुआन प्रदीपने पायचीत केले. मग बेअरस्टोने मोईन अली (२५)सोबत सहाव्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. १३ चौकारांसह बेअरस्टोने कसोटी कारकीर्दीतील तिसरे व चालू मालिकेतील दुसरे शतक साकारले.