‘टॉप्स’मधून वगळल्याने अरपिंदर नाराज

नवी दिल्ली : आशिया क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता तिहेरी उडीपटू अरपिंदर सिंगने क्रीडा मंत्रालयाच्या ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ म्हणजेच टॉप्स या योजनेतील निकषांबाबत नाराजी दर्शवली आहे.

अरपिंदरला ‘टॉप्स’ योजनेमधून क्रीडा मंत्रालयाने वगळल्याबाबत नाराजी व्यक्त करताना २७ वर्षीय अरपिंदर म्हणाला की, ‘‘करोना संसर्गाच्या स्थितीत कामगिरीच्या आधाराचा निकष क्रीडा मंत्रालय कशाप्रकारे ठरवते, हे समजत नाही. संपूर्ण वर्षभरात एकही क्रीडा स्पर्धा झालेली नाही. मला सराव चाचणीला बोलावले असते आणि त्यात कामगिरी चांगली झाली नसती तर मला ‘टॉप्स’मधून वगळण्याचे कारण मी समजू शकलो असतो. मात्र एकाही सराव चाचणीला न बोलावता माझ्या कामगिरीचा निकष कसा ठरवला जातो हे कळत नाही,’’ असे अरपिंदरने सांगितले.

अरपिंदरने २०१८ मधील इंडोनेशिया येथे झालेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्याला ‘टॉप्स’मधून वगळले असले तरी नीरज चोप्रा, तेजिंदर पाल सिंग तूर आणि हिमा दास या अन्य खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. ‘‘मी जालंधर येथे सध्या एकटा सराव करत आहे. ज्याप्रमाणे याआधी ज्या अंतरावर उडी मारायचो त्याच अंतरावर आताही सरावादरम्यान उडी मारत आहे. माझी तंदुरुस्ती चांगली राखली आहे,’’ असे अरपिंदर म्हणाला.

तो पुढे म्हणाला की, ‘‘दोन र्वष टॉप्समध्ये ठेवल्यावर आता मला तडकाफडकी वगळण्यात येते. मी काही चुकीचे केले नाही. टॉप्समधील अधिकाऱ्यांचा मला दूरध्वनी आला होता तेव्हा मला वगळण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र मी कामगिरी उंचावून दाखवतो असे आश्वासन दिले होते. याआधी मे-जूनमध्ये अमेरिकेला सरावासाठी जाण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र तेव्हा कोणतेच खेळाडू करोनाच्या टाळेबंदीमुळे सराव करत नसल्याने मी नकार दिला होता. मी यापुढे माझ्या कामगिरीने स्वत:ला सिद्ध करून दाखवेन,’’ असे अरपिंदरने सांगितले.

चार बॉक्सर्सचा ‘टॉप्स’ योजनेत समावेश

नवी दिल्ली : ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या चार भारतीय बॉक्सर्सचा ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ योजनेत (टॉप्स) समावेश करण्यात आला आहे. जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती सिमरनजित कौर (६० किलो), आशियाई पदकविजेती पूजा राणी (७५ किलो) त्याचबरोबर आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेता आशीष कुमार (७५ किलो) आणि कांस्यपदक विजेता सतीश कुमार (९१ किलोवरील) यांचाही ‘टॉप्स’ योजनेत समावेश करण्यात आला आहे. याआधी मेरी कोम, अमित पांघल, मनीष कौशिक आणि विकास कृष्णन यांना या योजनेत समाविष्ट करून घेण्यात आले आहे.