न्यूझीलंडकडे १७१ धावांची आघाडी

केन विल्यम्सन न्यूझीलंडचा सर्वाधिक कसोटी शतक झळकावणारा फलंदाज ठरला. याव्यतिरिक्त पावसामुळे खेळपट्टी ओलसर झाल्यामुळे पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा बराचसा वेळ वाया गेला. परंतु न्यूझीलंडने सामन्यावरील आपली पकड अधिक घट्ट केली आहे.

विल्यम्सनने १०२ धावांची शानदार खेळी साकारत १८व्या कसोटी शतकासह क्रिकेटरसिकांना एका विक्रमाचा साक्षीदार होण्याची संधी दिली. मार्टिन क्रो आणि रॉस टेलर यांच्या खात्यावर १७ शतके जमा आहेत. हा विक्रम विल्यम्सनने मोडीत काढला.

न्यूझीलंड संघाला सुस्थितीत नेल्यानंतर कर्णधार विल्यम्सनचा अडसर दूर करण्यात इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला यश आले. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद २२९ अशी मजल मारली असून, त्यांच्याकडे १७१ धावांची आघाडी आहे. एकंदर २३.१ षटकांच्या झालेल्या खेळात न्यूझीलंडला ५४ धावांची भर घालता आली. खेळ थांबला तेव्हा हेन्री निकोल्स ४९ धावांवर, बीजे वॉटलिंग १७ धावांत खेळत होते.

संक्षिप्त धावफलक

  • इंग्लंड (पहिला डाव) : ५८
  • न्यूझीलंड (पहिला डाव) : ९२.१ षटकांत ४ बाद २२९ (केन विल्यम्सन १०२, हेन्री निकोल्स खेळत आहे ४९; जेम्स अँडरसन ३/५३)