इंग्लंडच्या संघाचा माजी कर्णधार केव्हीन पीटरसन याने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाला भारतदौऱयाआधी एक सल्ला देऊ केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारत दौऱयावर जाण्याआधी फिरकी गोलंदाजीला सामोरे जाण्याचे कौशल्य अवगत करावे, नाहीतर त्यांनी दौरा रद्द करावा, असे पीटरसन म्हणाला. पीटरसनने क्रिकेट डॉटकॉमला मुलाखत दिली. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या आगामी भारत दौऱयाबाबत त्याचे मत जाणून घेण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ येत्या २३ फेब्रुवारीपासून भारतीय संघाविरूद्ध कसोटी मालिकेला सुरूवात करणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर पीटरसन म्हणाला की, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फिरकी गोलंदाजीसमोर फलंदाजी शिकण्याची गरज आहे आणि यासाठी त्यांच्याकडे खूप कमी वेळ आहे. तुम्हाला जर फिरकीविरोधात चांगले खेळता येत नसेल, तर भारतात जाणे टाळावे.

 

२०१२ साली पीटरसनच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडच्या कसोटी संघाने भारताला मात दिली होती. या मालिकेमध्ये पीटरसनने ४८.२९ च्या सरासरीने ३३८ धावा केल्या होत्या. जेव्हा तुम्ही भारत दौऱयावर जाता तेव्हा तुम्ही फिरकीविरुद्ध खेळण्याची तयारी करणे गरजेचे असते आणि यासाठी तुम्हाला फिरकीला पोषक खेळपट्टीच हवी अशी आवश्यकता नसते. तुम्ही कोणत्याही खेळपट्टीवर तुम्हाला गरज असलेल्या पद्धतीचा सराव करू शकता. आपण २००४ साला पासूनची ऑस्ट्रेलियाची दक्षिण आशियाई देशांमधली कामगिरीचा आढावा घेतला तर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज काही खास कामगिरी करू शकलेले नाहीत, याचा अंदाज येईल. दक्षिण आशियाई देशात ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या एकूण २० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला केवळ तीन सामन्यांत विजय प्राप्त करता आला आहे. त्यातही ऑस्ट्रेलियासाठी काळजीची बाब अशी की, कांगारुंच्या सध्याच्या संघातील फक्त दोन फलंदाजांची आशियाई देशात खेळण्याची सरासरी ही ४० च्या वर राहिली आहे. इतर कोणताही फलंदाज चांगल्या सरासरीने धावा करू शकलेला नाही.

कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला भारतीय संघ सध्या मजबूत आहे. त्यामुळे नक्कीच ऑस्ट्रेलियाला भारतीय संघाचे आव्हान फोडून काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. याचाच विचार करून पीटरसनने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फिरकीला सामोरे जाण्यासाठीचा सराव करण्याचा सल्ला दिला.