कोलकाता नाइट रायडर्सचे (केकेआर) गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर अहमदाबादमधील क्वारंटाइन कालावधीनंतर चेन्नईला परतले आहेत. हे दोघे आयपीएलचा १४वा हंगाम सुरू असताना करोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर हे दोघे अहमदाबादमध्ये आयसोलेशनमध्ये होते.

करोनाने बायो बबलला भेदल्यामुळे आयपीएलचा यंदाचा हंगाम बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी स्थगित केला. वरुण आणि संदीपनंतर दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या संघातही करोना पसरला. केकेआरचे टिम सेफर्ट आणि वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा यांनाही करोनाची लागण झाली.

टिम सेफर्टवर चेन्नई येथे उपचार असून असून याच हॉस्पिटलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज प्रशिक्षक मायकेल हसीही उपचार घेत आहे. तर प्रसिध कृष्णा बंगळुरू येथे होम आयसोलेशनमध्ये आहे.

टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे, शिवाय त्यांना इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी प्रसिध कृष्णाचा भारतीय कसोटी संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

करोना विषाणूमुळे आयपीएलचा १४वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. अनेक खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन थांबवण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज वृध्दिमान साहा करोना पॉझिटिव्ह आढळले आणि त्यानंतर आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.