कोणताही सामना असला तरी मी प्रत्येक चेंडूला सामोरे जाण्यापूर्वी गोलंदाजाच्या बारीकसारीक गोष्टींचेही सखोल विश्लेषण करतो, असा खुलासा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने केला.

भारताचा कसोटीपटू मयांक अगरवालच्या ‘ओपन नेट्स विथ मयांक’ या ऑनलाइन संवादातील दुसऱ्या भागादरम्यान कोहलीने आपल्या यशामागील रहस्य उलगडले. ‘‘माझे गणित अगदी सरळ सोपे आहे. समोरचा गोलंदाज कोणताही असो, अथवा कोणत्याही प्रकारचा क्रिकेट सामना असो, मी गोलंदाजाच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवतो. गोलंदाजाची देहबोली कोणत्या स्वरूपाची आहे, त्याने कशारीतीने चेंडू पकडला आहे, त्याची धावण्याची गती कशी आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यामुळेच मी प्रत्येक चेंडूला आत्मविश्वासाने सामोरा जातो,’’ असे कोहली म्हणाला.

‘‘या सर्व निरीक्षणाचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही जे अपेक्षित करत असता त्याच दिशेने अथवा टप्प्यावर गोलंदाज चेंडू टाकतो. पुढचा चेंडू कसा खेळायचा, याचा विचार मनात सुरू असल्यानेच हे शक्य होते. मनात अन्य विचार घोळत असल्यास अथवा निकालाची भीती असल्यास, अपयशाला सामोरे जावे लागते,’’ असेही कोहलीने सांगितले.

कोहलीने आतापर्यंत ८६ कसोटी आणि २४८ एकदिवसीय सामने खेळताना अनुक्रमे २७ आणि ४३ शतके झळकावली आहेत. आपल्या तयारीमध्येच या शतकांचे श्रेय लपले आहे, असेही कोहलीने नमूद केले.