भारतीय क्रिकेट संघाचा आधारस्तंभ विराट कोहली हा एक विलक्षण कर्णधार असून तो जबाबदाऱ्यांपासून कधीच पळ काढत नाही, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी सोमवारी कोहलीची पाठ थोपटली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) आयोजित करण्यात आलेल्या ‘वनडे फॉर चिल्ड्रन’ या कार्यक्रमासाठी श्रीकांत न्यूयॉर्क येथे उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत लहान मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित करून संपूर्ण विश्वचषकादरम्यान त्यांच्यासाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याशिवाय त्यांना मोफत सामन्यांचा आनंद लुटता यावा, यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येणार आहेत.

१९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य श्रीकांत यांना आगामी विश्वचषकासाठी कोहलीचे आक्रमक नेतृत्वच संघाला विजेतेपदापर्यंत घेऊन जाईल, असे वाटते. ‘‘कोहलीच्या रूपात भारताला एक आक्रमक व जिगरबाज कर्णधार लाभला आहे. मुख्य म्हणजे कोणत्याही जबाबदारीला कोहली घाबरत नाही किंवा त्यापासून पळ काढत नाही. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात अनुभवी व शांत स्वभावाच्या महेंद्रसिंह धोनीच्या साथीने कोहली पुन्हा एकदा भारताला जगजेत्ता बनवेल,’’ असे माजी राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष श्रीकांत म्हणाले.

विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारताच्या १५ सदस्यीय संघाविषयी विचारले असता श्रीकांत म्हणाले, ‘‘भारताच्या संघनिवडीवर मी फार आनंदी आहे. उत्साही, आत्मविश्वासू आणि शांत चित्ताने खेळणाऱ्या खेळाडूंचा योग्य मेळ निवड समितीने साधला आहे. खेळाडूंनी चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे न बाळगता बिनधास्तपणे खेळाचा आनंद लुटल्यास, यंदा विश्वचषक आपलाच आहे.’’

‘‘आत्मविश्वासू खेळाडूचे उदाहरण द्यायचे झाल्यास तुमच्या डोक्यात सर्वप्रथम कपिल देवचे नाव येईल. सचिन तेंडुलकरची क्रिकेटविषयी आवड व प्रेम, कोहलीचा आक्रमकपणा आणि धोनीचा शांत व दृढनिश्चयी स्वभाव, असे अनेक नमुने आहेत. त्यामुळे यंदाच्या भारतीय संघातही भिन्न वृतीचे खेळाडू एकत्रित आले असून त्यांचा खेळ पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत,’’ असेही श्रीकांत यांनी सांगितले.