कोलकात्याचा बंगळुरुवर पाच विकेट्स राखून विजय; गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी
युसूफ पठाण आणि आंद्रे रसेल या दोन्ही धडाकेबाज फलंदाजांनी बहारदार फटक्यांचे धुमशान घातले आणि अशक्यप्राय वाटणारा विजय संघाला मिळवून दिला. या दोघांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघावर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह कोलकात्याने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले.
कोलकात्याने नाणेफेक जिंकून बंगळुरुला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि मॉर्ने मॉर्केलने ख्रिस गेलला स्वस्तात माघारी धाडले. पण त्यानंतर के. एल. राहुल आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकांमुळे बंगळुरुच्या डावाला स्थैर्य मिळाले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूंमध्ये ७४ धावांची भागीदारी रचली. हे दोघेही संयतपणे कोलकात्याच्या गोलंदाजीचा समाचार घेत होते. कोहलीपेक्षा राहुल यावेळी अधिक आक्रमक खेळत होता. पण पियुष चावलाने अप्रतिम चेंडू टाकत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. राहुलने सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५२ धावा केल्या. राहुल बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या ए बी डी’व्हिलियर्सलाही चावलाने स्वस्तात बाद केले. त्यानंतर कोहली अधिक आक्रमक खेळायला लागला. सामन्याचे सतरावे षटक हे चांगलेच रंगतदार झाले. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेत कोहलीने अर्धशतक पूर्ण केले. मॉर्केलच्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर गौतम गंभीरने कोहलीचा झेल सोडला, पण या जीवदानाचा फायदा कोहलीला घेता आला नाही. कारण त्यानंतरच्याच चेंडूवर कोहलीचा झेल आंद्रे रसेलने टीपत त्याला माघारी धाडले. कोहलीने यावेळी चार षटकारांच्या जोरावर ५२ धावा केल्या. सतराव्या षटकानंतर बंगळुरुची ४ बाद १३१ अशी स्थिती होती. पण त्यानंतर शेन वॉटसन (३४) सचिन बेबी (१६) आणि स्टुअर्ट बिन्नी (१६) यांनी धडाकेबाज खेळी केल्यामुळे बंगळुरुला १८५ धावा करणे शक्य झाले. कोलकाताकडून मॉर्ने मॉर्केल आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
बंगळुरुच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची १०.१ षटकांत ४ बाद ६९ अशी स्थिती होती. पण त्यानंतर मैदानात फटक्यांची आतषबाजी केली ती आंद्रे रसेल आणि युसूफ पठाण या धडाकेबाज फलंदाजांनी. या दोघांनी पंधराव्या षटकापासून मोठे फटकेबाजीला सुरुवात केली. पंधराव्या षटकात रसेलच्या फटकेबाजीने संघाला १८ धावा मिळवून दिल्या. त्यानंतर शेन वॉटसनच्या सतराव्या षटकात युसूफ पठाणने चार चौकार, एक षटकार आणि एक दुहेरी धाव घेत तब्बल २४ धावांची लूट केली आणि सामना कोलकात्याच्या बाजूने झुकला. अठराव्या षटकात यजुवेंद्र चहलने रसेलला बाद केले. रसेलने एक चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ३९ धावा केल्या.
रसेल बाद झाल्यावर पठाणने मोठय़ा फटक्यांची आतषबाजी कायम ठेवली. १९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत पठाणने अर्धशतक पूर्ण केले. पठाणने २९ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ६० धावांची खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : २० षटकांत ७ बाद १८५ (के.एल.राहुल ५२, विराट कोहली ५२; मॉर्ने मॉर्केल २/२८, पियुष चावला २/३२) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १९.१ षटकांत ५ बाद १८७ (युसूफ पठाण नाबाद ६०, आंद्रे रसेल ३९; युझवेंद्र चहल २/२७ )
सामनावीर : आंद्रे रसेल