15 October 2019

News Flash

कोरिया ओपन सुपर सीरिज: अंतिम सामन्यात सिंधू विजयी

सिंधूने ओकुहारावर २२-२०, ११-२१, २१-१८ असा रोमहर्षक विजय नोंदवला

संग्रहित छायाचित्र

कोरिया ओपन सुपर सीरिजच्या अंतिम सामन्यात भारताच्या पी व्ही सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सिंधूने ओकुहारावर २२-२०, ११-२१, २१-१८ असा रोमहर्षक विजय नोंदवला.

कोरिया ओपन सुपर सीरिजच्या अंतिम सामन्यात पी व्ही सिंधूसमोर जपानच्या ओकुहाराचे आव्हान होते. पहिल्या सेटमध्ये सिंधूने ओकुहाराला काँटे की टक्कर देत तिचा पराभव केला. पहिला सेट सिंधूने २२-२० ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र सिंधूला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या सेटमध्ये ओकुहाराने एकतर्फी विजय मिळवला. ओकुहाराने दुसरा सेट २१- ११ ने जिंकला.

सिंधू आणि ओकुहाराने प्रत्येकी एक सेट जिंकल्याने तिसरा सेट हा उत्कंठा वाढवणारा ठरला. तिसऱ्या सेटमध्ये सिंधूने आघाडी घेतली. सिंधू हा सेट सहज जिंकेल असे वाटत असतानाच ओकुहाराने सामन्यात पुनरागमन केले. ओकुहाराचे फटके परतवून लावताना सिंधूची दमछाक होत होती. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे क्रीडा प्रेमींना चमकदार रॅली पाहायला मिळाल्या. तिसरा सेट सिंधूने २१-१८ ने जिंकला. कोरियन ओपन जिंकणारी ती पहिली भारतीय  महिला बॅडमिंटनपटू ठरली.

दोन आठवड्यांपूर्वी जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ओकुहाराने सिंधूचा पराभव केला होता. कोरिया ओपन सुपर सीरिजमध्ये ओकुहारावर मात करत सिंधूने या पराभवाची परतफेड केली.

First Published on September 17, 2017 12:43 pm

Web Title: korea open badminton superseries final india pv sindhu beats japan nozomi okuhara to win series title
टॅग Pv Sindhu