ला लीगा फुटबॉल स्पर्धा

लिओनेल मेसी याच्या चार गोलांच्या जोरावर बार्सिलोनाने ला लीगा फुटबॉल स्पर्धेत आयबरला ५-० असा पराभवाचा धक्का दिला. याबरोबरच बार्सिलोना संघाने स्पर्धेत अग्रस्थान पटकावले. त्यातच रेयाल माद्रिद संघाला लेव्हांटेकडून ०-१ पराभवाचा धक्का बसला. या पराभवामुळे रेयाल माद्रिदला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.

मेसी याने १४व्या, ३७व्या, ४०व्या आणि ८७व्या मिनिटाला गोल झळकावले. मेसी याने बार्सिलोनाकडून या स्पर्धेत ३६वेळा तीनहून अधिक गोल केले आहेत. सामन्यातील पाचवा गोल आर्थर मेलो याने ८९व्या मिनिटाला करत बार्सिलोनाच्या मोठय़ा विजयावर शिक्कामोर्तब केले. बार्सिलोना मंगळवारी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत नापोली संघाशी दोन हात करेल.

चॅम्पियन्स लीगमध्ये रेयाल माद्रिदची बुधवारी मँचेस्टर सिटीशी लढत होणार आहे. मात्र दोन महत्त्वपूर्ण लढतींपूर्वी रेयाल माद्रिदला पराभवाचा धक्का बसला. त्यातच त्यांचा महत्त्वपूर्ण खेळाडू इडेन हझार्डला दुखापत झाली.