सहा वेळचा फॉम्र्युला-१ विजेता लुइस हॅमिल्टनने करोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी स्वयंअलगीकरण केले आहे. ३५ वर्षीय हॅमिल्टनने करोनाची तपासणी करण्यास मात्र नकार दिला आहे. महिन्याच्या सुरुवातीस लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान हॅमिल्टनची एद्रीस अल्बा आणि कॅनडाचे पंतप्रधान पीरी ट्रिदेओ यांच्याशी भेट झाली होती. या दोघांनाही करोनाची लागण झाली असल्याने हॅमिल्टनने आता सावधगिरी बाळगून जवळपास गेल्या आठवडय़ापासून घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे.

‘‘लंडनला झालेल्या त्या कार्यक्रमानंतर परतल्यावर माझ्या खासगी डॉक्टरांशी मी संवाद साधला. त्यांनी मला काहीही चिंता करण्याचे कारण नाही असे सांगितल्यानेच मी करोनाची तपासणी करण्यासाठी अद्याप गेलेलो नाही. परंतु स्वत:ला इतरांपासून दूर ठेवण्याच्या निर्णयाचे मी पालन करत आहे,’’ असे हॅमिल्टन म्हणाला.

थॉमस, उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर

पुरुष आणि महिला जागतिक संघांसाठी असेलली थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा तीन महिन्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. मे महिन्यात डेन्मार्क येथे होणाऱ्या या स्पर्धा आता १५ ते २३ ऑगस्टदरम्यान खेळवण्यात येतील.

जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) डेन्मार्क संघटनेसोबत चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर बीडब्ल्यूएफने शुक्रवारी पाच आणखीन स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात ऑलिम्पिक पात्रता स्पर्धाचाही समावेश होता. बीडब्ल्यूएफचे महासचिव थॉमस लुन्ड यांनी सांगितले की, ‘‘आरोग्य, सुरक्षा आणि अन्य गोष्टींना महत्त्व देत आम्ही सर्वानीच स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांच्या आरोग्याला आमचे प्रथम प्राधान्य राहील.’’