पोर्टिमाओ : ब्रिटनचा ड्रायव्हर लुइस हॅमिल्टन याने फॉम्र्युला-वनच्या इतिहासात रविवारी नव्या अध्यायाची नोंद केली. पोर्तुगीज ग्रां. प्रि. शर्यतीचे जेतेपद पटकावत हॅमिल्टनने फॉम्र्युला-वनमध्ये ९२ जेतेपदे मिळवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने मायकेल शूमाकर याचा विक्रम मोडीत काढला.

हॅमिल्टनने मर्सिडिझ संघातील सहकारी वाल्टेरी बोट्टास याला २५.६ सेकंदाच्या फरकाने मागे टाकत सहजपणे जेतेपद पटकावले. रेड बुलच्या मॅक्स वेस्र्टापेन याने तिसरे स्थान प्राप्त केले. हॅमिल्टनचे हे यंदाच्या मोसमातील आठवे जेतेपद ठरले.

हॅमिल्टनने २००७मध्ये फॉम्र्युला-वनमधील पहिली शर्यत जिंकली. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्याने जगज्जेतेपदाला गवसणी घातली. २०१३मध्ये शूमाकर निवृत्त झाल्यानंतर त्याची मर्सिडिझ संघातील जागा हॅमिल्टनने घेतली. त्यानंतर मर्सिडिझचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हॅमिल्टनने पाच जगज्जेतेपदे मिळवली. आता शूमाकरच्या सात जगज्जेतपदांच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी यंदा हॅमिल्टनकडे आहे.