संघाच्या गरजेनुसार समर्थपणे खेळण्याचा रहाणेचा निर्धार
संघाच्या गरजेनुसार संघ व्यवस्थापन मला ज्या क्रमांकावर फलंदाजी करायला सांगेल, ती जबाबदारी मी समर्थपणे सांभाळीन. कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी स्वतंत्र मानसिकता जपावी लागते. त्यानुसार त्या क्रमांकाला न्याय देणे मला जमते, असे मत भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणेने व्यक्त केले.
माझ्या १८ कसोटी सामन्यांच्या कारकीर्दीतील १६ सामन्यांत मी मधल्या फळीत पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली. परंतु श्रीलंकेतील मागील दोन कसोटींमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचे आव्हान माझ्यासमोर होते. मी त्याला न्याय देत शतकी खेळीही साकारली आणि ती कसोटी आम्ही जिंकली, असे रहाणेने सांगितले. श्रीलंकेविरुद्धचा नुकताच झालेला ऐतिहासिक दौरा आणि आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचे आव्हान या पाश्र्वभूमीवर रहाणेशी केलेली खास बातचीत-
ल्ल भारताचे कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघ याचप्रमाणे मुंबई आणि राजस्थान रॉयल्स अशा विविध संघांच्या जबाबदाऱ्यांकडे तू कसे पाहतोस?
मी सलामीवीर म्हणून माझ्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. पहिल्या दोन हंगामांमध्ये मुंबईकडून सलामी केल्यानंतर मी तिसऱ्या हंगामात तिसऱ्या स्थानावर खेळलो. माझ्या एकंदर कारकीर्दीत मला विविध क्रमांकांवर फलंदाजी करायची संधी मिळाली आहे, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या प्रत्येक जबाबदाऱ्यांकडे मी सकारात्मक पद्धतीने पाहतो आहे. प्रत्येक संघांकडून खेळताना विविध सामन्यांतील परिस्थितीने मला शिकवले आहे. ही प्रक्रिया जेव्हा थांबते, तेव्हा माणसाचा विकास खुंटतो. विश्वचषकात मी चौथ्या क्रमांकावर खेळलो. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळीने मला खूप मोठा आत्मविश्वास दिला.
ल्ल श्रीलंकेविरुद्धची मालिका, तुझे शतक आणि झेलचा विश्वविक्रम याविषयी काय सांगशील?
२२ वर्षांनंतर श्रीलंकेच्या भूमीवर मिळवलेल्या विजयामुळे एकंदर ही मालिका संस्मरणीय ठरली. आठ झेल घेण्याचा विश्वविक्रम किंवा शतकी खेळी यापेक्षा मला भारताचा विजय जास्त मोलाचा वाटतो. कारण सुरुवातीला ०-१ अशा पिछाडीवर पडल्यानंतर मालिकेत पुनरागमन करून ती २-१ अशा फरकाने जिंकण्याची किमया साधणे, हे खूप महत्त्वाचे आहे.
ल्ल क्षेत्ररक्षणातील विश्वविक्रमाचे श्रेय कुणाला देशील?
क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर. श्रीधर यांना त्याचे श्रेय जाते. श्रीलंकेत जाण्याआधीच कर्णधार विराट कोहलीने मला स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणार असल्याचे सांगितले होते. सराव सत्रात आम्ही ५० ते १०० झेल घेण्याचा सराव करायचो. सामना सुरू व्हायच्या आधीही आमचा हा सराव सुरू असायचा. लक्ष केंद्रित करून चेंडूवर नजर ठेवणे, ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. मी सध्या ध्यानधारणासुद्धा करतो. फिरकी गोलंदाजी चालू असताना स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना अतिशय सावध राहावे लागते. खेळपटट्टी किती वेगवान आहे, किती उसळी मारते आहे. त्यानुसार चेंडू कसा येणार, याचा अंदाज घ्यावा लागतो.
ल्ल परदेशात फिरकी खेळणे भारतीय फलंदाजांना कठीण जाते आहे का?
फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळणे आम्हाला कठीण जाते, असे मला वाटत नाही. आम्ही सकारात्मक पद्धतीने खेळतो. त्यांच्या फिरकी गोलंदाजांना याचे श्रेय द्यायला हवे.
ल्ल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी मालिकेत डेल स्टेनच्या नेतृत्वाखालील वेगवान माऱ्याचा मुकाबला करावा लागणार आहे. या आव्हानाचा कसा विचार करतोस?
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आम्ही अतिशय चांगली कामगिरी बजावली होती. स्टेन आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या माऱ्याचा सामना करणे, हे आव्हानात्मकच असणार आहे. परंतु श्रीलंकेविरुद्ध आता आम्ही मालिका जिंकून आलो आहोत, त्यामुळे हा आत्मविश्वास प्रेरणादायी ठरणारा असेल. भारतीय वातावरणाचा आम्हाला अंदाज आहे. त्यानुसार आगामी मालिकेसाठी तयारी करायला पुरेसा वेळ मिळाला आहे.
ल्ल रोहित शर्मा आणि चेतेश्वर शर्माच्या फलंदाजीबाबत तू काय सांगशील?
प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात चढउतार येतात. कोणत्याही खेळाडूचा वाईट काळ चालू असतो, तेव्हा तो त्या परिस्थितीला कसा सामोरा जातो, हे महत्त्वाचे असते. तसेच त्याच्या सहकाऱ्यांची त्याला या काळात मदत होते. परंतु रोहित या चढउतारांच्या स्थितीला त्याच रीतीने सामोरा जातो. त्याने अनेक सामने जिंकून दिले असल्यामुळे सर्वाचाच त्याच्यावर विश्वास आहे. चेतेश्वर पुजारा बऱ्याच काळाने संघात आला. परंतु मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले, हे आम्हाला सर्वानाच शिकवण्यासारखे आहे.
ल्ल तुझ्या वडिलांनी नुकतेच तुला फलंदाजी करतानाचे रेखाचित्र भेट म्हणून दिले आहे. याविषयी काय सांगशील?
दोन दिवसांपूर्वी आम्ही नव्या घरात राहायला गेलो. तिथे माझ्या वडिलांनी हे रेखाचित्र तयार करून घेतले आहे आणि ही माझ्यासाठी अनोखी भेट ठरली. लॉर्ड्सवरील माझी खास खेळी ही भिंतीवर साकारण्यात आली आहे.
ल्ल तुझी कसोटीमधील चारही शतके ऐतिहासिक मैदानांवर झाली आहेत. हे तुझ्या कारकीर्दीत किती महत्त्वाचे मानतोस?
माझी चार कसोटी शतके ऐतिहासिक मैदानांवर झाली, ते सामनेही महत्त्वाचे ठरले. प्रत्येक डावात खेळी साकारण्यासाठी जाताना मी त्याच जिद्दीने जातो. हे सारे काही शतक झळकावल्यानंतर घडले आहे.