ईस्पानयोलवर २-०ने मात करीत गुणतालिकेत अव्वल

लिओनेल मेसीने उत्तरार्धात त्याच्या खेळाच्या जादूचे दर्शन घडवत केलेल्या दोन गोलीच्या बळावर बार्सिलोनाने ईस्पानयोलवर २-०ने मात केली. तसेच ला लिगा फुटबॉलमध्ये प्रतिस्पर्धी संघांपेक्षा १० गुणांची भक्कम आघाडी मिळवली आहे.

ईस्पानयोल संघाने सामन्याच्या पूर्वार्धात अत्यंत निकराची झुंज दिली. मेसीसह अन्य आक्रमकांच्या आक्रमणांना ईस्पानयोलने रोखले. ईस्पानयोलच्या बचाव फळीने बार्सिलोनाचे आक्रमण अजिबात यशस्वी होणार नाही, याची सातत्याने काळजी घेतली. मात्र उत्तरार्धात बार्सिलोनाने त्यांच्या आक्रमणाची धार अधिकच वाढवत नेली.

अखेरीस सामन्याच्या ७१व्या मिनिटाला मेसीने एक अफलातून गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ईस्पानयोलच्या आक्रमकांनी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना अपयश येत असतानाच बार्सिलोनाला १९ यार्डावरून एक फ्री किकची संधी मिळाली. सामना संपण्यास अवघा एक मिनिट बाकी असताना मेसीने त्या संधीचा अचूक फायदा उठवत पुन्हा त्याच्या जादूची कमाल दाखवून बार्सिलोनाला २-० असा विजय मिळवून दिला.  त्यामुळे मेसीकडे पूर्वीइतकीच जादू कायम असल्याचे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले.

सर्वाधिक गोल

मेसीने मागील चार सामन्यांमध्ये मिळून एकूण आठ गोल लगावले आहेत. त्यामुळे ला लिगा स्पर्धेत त्याचे एकूण ३१ गोल झाले आहेत. त्याच्या क्लबकडून हे सर्वाधिक गोल असून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लुईस सुआरेझने त्याच्यापेक्षा १३ गोल कमी केले आहेत.

त्या फ्री किकवर मेसी इतकी अफलातून किक मारेल, अशी मी कल्पनादेखील केली नव्हती. मात्र, तो मेसी असल्याची जाणीव त्याने करून दिली. मेसीच्या संघाचे मार्गदर्शक बनणे हा खूप आनंददायी अनुभव आहे.    – एर्नेस्टो व्हॅलव्हेरडे, बार्सिलोना प्रशिक्षक