श्रीलंकेच्या २७५ धावांच्या आव्हानाचा भारतीय संघाने यशस्वी पाठलाग करत दुसरा एकदिवसीय सामनाही खिशात घातला आहे.
भारताकडून नाबाद १२१ धावांची नाबाद खेळी साकारणारा युवा फलंदाज अंबाती रायडू विजयाचा शिल्पकार ठरला. कर्णधार कोहलीनेही रायडूला उत्तम साथ देत ४९ धावांची खेळी केली. सलमीवीर शिखर धवनही सध्या चांगल्या फॉर्मात आहे. शिखर धवनने तडफदार ७९ धावा ठोकल्या. श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला सुरूवातीलाच अजिंक्य राहणेच्या रुपात पहिला झटका बसला. अजिंक्य राहणे केवळ ८ धावा ठोकून माघारी परतला. त्यानंतर शिखर धवन आणि अंबाती रायडू संयमी खेळी करत भारताच्या धावसंख्येला आकार देत १२२ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर विराटने कर्णधारी खेळी करून भारताच्या विजयात योगदान दिले.
अहमदाबादमध्ये झालेल्या या दुसऱया एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेणाऱया श्रीलंकेचीही सुरूवात खराब झाली होती. भारतीय गोलंदाजांना सुरूवातीला श्रीलंकेच्या धावसंख्येवर लगाम घालण्यात यश आले होते. मात्र, श्रीलंकेचा कर्णधार मॅथ्यूजने अखेरपर्यंत एकहाती किल्ला लढवत कर्णधारी खेळी साकारली. मॅथ्यूजने नाबाद ९२ धावा ठोकून संघाच्या धावसंख्येला आकार दिला. पन्नास षटकांमध्ये श्रीलंकेला ८ बाद २७४ इतकी मजल मारता आली. भारताकडून उमेश यादव, अक्षर पटेल, आर.अश्विन यांनी प्रत्येकी दोन तर, रविंद्र जडेजाने एक गडी बाद केले. 
वेगवान गोलंदाज उमेश यादवने सलामीवीर परेराला खातेही उघडू न देता माघारी धाडले होते. त्यानंतर आर. अश्विनने जयवर्दनेला आपल्या फिरकी जाळ्यात ओढून झेलबाद केले. स्फोटक फलंदाज दिलशान चांगली कामगिरी करत असताना अक्षर पटेलने दिलशानच्या स्फोटकी खेळीला लगाम घातला. अक्षरने दिलशानला त्रिफळाबाद केले. संगकारा आणि मॅथ्यूजवर संघाच्या धावसंख्येला आकार देण्यास सुरूवात केली. संगकाराने आपले अर्धशतकही गाठले परंतु, जलद फलंदाजीच्या नादात संगकाराने ६१ धावांवर आपली विकेट गमावली. त्यानंतर कर्णधार मॅथ्यूजने अखेरपर्यंत झंझावाती खेळी साकारून संघाच्या धावसंख्येला २५० आकडा पार करुन दिला. मात्र, त्याला साथ देण्यात इतर फलंदाज अपयशी ठरताना दिसले. 
स्कोअरकार्ड-