आठवडय़ाची मुलाखत : किदम्बी श्रीकांत, भारताचा बॅडमिंटनपटू

प्रत्येक हंगामाप्रमाणे यंदाही चांगला खेळ करण्याचे ठरवले होते. दुखापतीतून सावरल्याने सर्वोत्तम खेळ होईल याची खात्री होती. स्पर्धेगणिक खेळ उंचावण्यावर आणि मागील चुका टाळण्यावर माझा भर असतो. तसा यंदाही होता. मात्र अमुक इतक्या स्पर्धा जिंकेन, असे ठरवले नव्हते. या वर्षी मला चार स्पर्धा जिंकता आल्या. त्याचा आनंद निश्चितच आहे, असे भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने सांगितले.

श्रीकांतने यंदा इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियन, डेन्मार्क आणि फ्रेंच अशा चार सुपर सीरिज स्पर्धा जिंकल्या आहेत. एका हंगामात इतक्या स्पर्धा जिंकत श्रीकांतने विक्रमवीरांच्या यादीतही स्थान मिळवले आहे. यंदाचे वर्ष माझ्यासाठी संस्मरणीय ठरले असून त्यामुळे आणखी सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली, असे त्याने म्हटले आहे. नुकतेच जागतिक बॅडमिंटन क्रमवारीतील दुसरे स्थान काबीज करणाऱ्या श्रीकांतशी केलेली खास बातचीत-

  • यंदा तू जिंकलेल्या चार सुपर सीरिज स्पर्धापैकी कुठले जेतेपद सर्वात आव्हानात्मक होते?

यंदा माझा खेळ चांगला उंचावला. चार खुल्या सुपर सीरिज स्पर्धामध्ये पटकावले. त्या जेतेपदांची तुलना करता येणार नाही. प्रत्येक स्पर्धेत चांगले प्रतिस्पर्धी लाभले. अनेक सामने तीन गेमपर्यंत चालले. अनेकदा पिछाडी भरून काढली. त्यामुळे खेळलेला प्रत्येक सामना चुरशीचा होता. इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियन तसेच डेन्मार्क आणि फ्रेंच या स्पर्धा लागोपाठ जिंकल्या तरी सिंगापूर खुल्या सुपर सीरिजने माझे मनोबल उंचावले. या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, परंतु एकाहून अधिक स्पर्धा जिंकू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण झाला.

  • दुखापतीचे दडपण वाटते का?

दुखापतीतून सावरण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. सुरुवातीचे तीन-चार महिने माझ्यासाठी कठीण होते. मात्र प्रशिक्षक आणि फिजिओंची खूप मदत झाली. आता दुखापतीतून पूर्णपणे सावरलो आहे. मात्र दुखापत हा खेळाचा एक भाग आहे. प्रत्येक खेळाडूला त्यातून जावे लागते. त्या वेळी तुम्ही स्वत:ला कसे सावरता, यावरही तुमची पुढील वाटचाल अवलंबून असते.

  • एखाद्या स्पर्धेला सामोरे जाण्यापूर्वी तुझी रणनीती कशी असते?

प्रत्येक खेळाडू स्पर्धेपूर्वी त्याचा खेळ आणि तंदुरुस्ती यावर मेहनत घेत असतो. प्रत्यक्ष स्पर्धेबाबतच्या योजनेबाबत सांगायचे झाले तर माझा प्रतिस्पर्धी कोण आहे, यावर खूप काही अवलंबून असते. त्या खेळाडूविरुद्ध यापूर्वी खेळलो असेन तर त्याची बलस्थाने आणि कमकुवत बाबी यांचा अभ्यास करतो. मात्र एखाद्या खेळाडूविरुद्ध प्रथमच खेळायचे असल्यास त्याच्या आधीच्या सामन्यांचे चित्रण पाहून डावपेच आखतो. मात्र प्रतिस्पध्र्याच्या खेळापेक्षा माझा खेळ अधिक चांगला कसा होईल, याला प्राधान्य देतो.

  • पुढील वर्षी किती स्पर्धा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे?

पुढील वर्षांचा मी आताच विचार केलेला नाही. त्या वेळच्या खेळावर आणि तंदुरुस्तीवर सर्व काही अवलंबून आहे. मात्र यंदाच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा निश्चित प्रयत्न करेन. विक्रमी चार खुल्या सुपर सीरिज जेतेपदांमुळे मला आणखी सर्वोत्तम कामगिरी करण्याचे बळ मिळाले आहे. पुढील वर्षी प्रत्येक स्पर्धेत माझ्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल. मात्र त्याचे तितके दडपण वाटत नाही. पुढील हंगामात मी नेमक्या स्पर्धा खेळणार आहे हा माझा निर्णय असला तरी प्रशिक्षकांशी सल्लामसलत करून कुठल्या स्पर्धात खेळायचे ते ठरवेन.

  • राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाबाबत काय सांगशील?

प्रत्येक प्रमुख खेळाडूने राष्ट्रीय स्पर्धेत खेळावे, असे मला वाटते. वर्षभरात अनेक स्पर्धा खेळत असलो तरी राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यास मी उत्सुक आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी बॅडमिंटन असोसिएशनने कुणावरही दबाव आणलेला नाही. सर्वच प्रमुख बॅडमिंटनपटू खेळत असल्याने स्पर्धेची रंगत वाढली आहे, असे मला वाटते.