जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा

जगज्जेतेपदासाठी मॅग्नस कार्लसन, फॅबियानो कारुआना यांच्यात शुक्रवारपासून लढत

गतविजेता मॅग्नस कार्लसन आणि आव्हानवीर फॅबियानो कारुआना यांच्यात शुक्रवारपासून लंडन येथील द कॉलेजमध्ये जगज्जेतेपदासाठीची झुंज रंगणार आहे. नॉर्वेच्या २७ वर्षीय कार्लसनने याआधी अमेरिकेच्या २६ वर्षीय कारुआनाविरुद्ध चमकदार कामगिरी केल्यामुळे कार्लसन २०१३ पासून आपले जगज्जेतेपद कायम राखण्यासाठी सज्ज झाला आहे. कार्लसन (२८३५) आणि कारुआना (२८३२) यांच्या रेटिंग गुणांमध्ये फक्त तीन गुणांचा फरक असल्यामुळे ही जगज्जेतेपदाची लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

१२ फेऱ्यांच्या या शर्यतीत जर आधी किंवा नंतर निर्णय घेण्याची वेळ आली तर कारुआना हा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र क्लासिकल फेऱ्यांची ही लढत ६-६ अशी बरोबरीत सुटली तर आक्रमक आणि वेगवान खेळ करण्यासाठी प्रसिद्ध असलेला कार्लसन हा टायब्रेकमध्ये विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असेल.

अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत आपल्या प्रतिस्पध्र्याविषयी कार्लसन म्हणाला होता की, ‘‘कारुआनाची खेळण्याची शैली भक्कम असली तरी तो डावाचा खोलवर अभ्यास करतो. कारुआना आपले प्यादे गमावण्याला प्राधान्य देत नसून प्रतिस्पध्र्याच्या प्याद्याच्या पुढे जाऊन तो थेट राजावर हल्ला चढवतो.कारुआनाच्या हल्ल्यांवर प्रतिहल्ले चढवून मी त्याच्याविरुद्धच्या अनेक लढतीत विजय मिळवला आहे.’’

कार्लसन तीन जगज्जेतेपदांचा मानकरी

२०१४ मध्ये भारतात झालेल्या जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कार्लसनने विश्वनाथन आनंदची मक्तेदारी मोडीत काढत पहिल्यांदा जगज्जेता होण्याचा मान पटकावला होता. त्याच वर्षी त्याने आनंदला हरवून ब्लिट्झ प्रकाराचेही जगज्जेतेपद पटकावले होते. २०१६ मध्ये रशियाच्या सर्जी कार्याकिनला धूळ चारून कार्लसन तिसऱ्यांदा जगज्जेता ठरला होता.

कारुआनाच्या कामगिरीवरही लक्ष

१९७२ मध्ये बॉबी फिशर यांनी अमेरिकेसाठी अखेरचे जेतपद पटकावले होते. अमेरिकेचा फिशर आणि रशियाचा बोरीस स्पास्की या दोन महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशांमधील खेळाडूंमध्ये जणू युद्धच रंगले होते. त्यानंतर अमेरिकेच्या एकाही बुद्धिबळपटूने जगज्जेतेपद पटकावले नाही. त्यामुळे कारुआनाच्या कामगिरीकडे अमेरिकन प्रसारमाध्यमांचे लक्ष लागले आहे.

स्थळ : द कॉलेज, लंडन

वेळ : रात्री १०.३० वा.