जगज्जेता मॅग्नस कार्लसनशी पुन्हा आव्हान द्यायचे असेल, तर भारताच्या विश्नाथन आनंदला येथे सुरू असलेल्या जागतिक आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेत उर्वरित दोन्ही फेऱ्या जिंकणे अनिवार्य आहे.

या स्पर्धेतील बाराव्या फेरीअखेर सर्जी कर्जाकिन व फॅबिआनो कारुआना यांनी संयुक्त आघाडी घेतली आहे. त्यांचे प्रत्येकी सात गुण झाले आहेत. आनंद याचे सहा गुण झाले आहेत. शनिवारचा विश्रांतीचा दिवस असल्यामुळे सर्वच खेळाडूंना आपले मनोधैर्य उंचावण्यासाठी संधी मिळाली. आनंदसाठी ही विश्रांती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. तेराव्या फेरीत त्याला अनिष गिरी याच्याशी खेळावे लागणार आहे.