ओस्लो : विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने अल्टिबॉक्स नॉर्वे सुपर ग्रॅँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद एक फेरी बाकी ठेवून पटकावले. पारंपरिक (क्लासिकल) प्रकारात झालेल्या या स्पर्धेत त्याने इराणच्या १७ वर्षीय अलिरेझा फिरुझाला पराभूत के ले.

नॉर्वे येथील स्टॅवॅँगर शहरात पार पडलेल्या या स्पर्धेत कार्लसनने फिरुझाविरुद्ध काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना रेटी पद्धतीने खेळ सुरू केला. कार्लसनने ६९ चालींमध्ये फिरुझाला नमवले. याबरोबरच ९ फेऱ्यांअखेर १९.५ गुणांची दणदणीत आघाडी घेत कार्लसनने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. फिरुझाने मधल्या टप्प्यावर काही चालींनी कार्लसनला थोडेफार चकित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कार्लसनने अखेर हत्ती, घोडा या प्याद्यांचा सुरेख वापर करत विजय खेचून आणला. स्पर्धेत फिरुझा १५.५ गुणांसह दुसऱ्या, लेव्हॉन अरोनियान १४.५

गुणांसह तिसऱ्या आणि फॅबियानो कॅरुआना १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहेत.

या स्पर्धेत पाचव्या फेरीत कार्लसनची १२५ सामन्यांची अपराजित राहण्याची मालिका खंडित झाली होती. पोलंडच्या जॅन-ख्रिस्तोफ डय़ुडाकडून कार्लसनला पाचव्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र पुढील चार सामने जिंकत कार्लसनने त्याच्या सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले.

नेशन्स सांघिक बुद्धिबळ स्पर्धा :भारताच्या महिला संयुक्त आघाडीवर

चेन्नई : भारताने आशिया ऑनलाइन नेशन्स सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत सहा फेऱ्यांअखेर संयुक्तरीत्या आघाडी घेतली. फिलिपाइन्स आणि इराणसोबत भारत संयुक्तपणे १० गुणांसह आघाडीवर आहे. भारताने दिवसाची सुरुवात म्यानमारला ३.५-०.५ असे नमवत केली. पाचव्या फेरीत भारताने सिंगापूरचा ४-० असा सहज पराभव केला. इंडोनेशियावर सहाव्या फेरीत भारताने ३-१ असा विजय मिळवला. भारताच्या तीनही विजयांमध्ये ग्रँडमास्टर आर. वैशाली आणि आंतरराष्ट्रीय मास्टर पद्मिनी राऊत यांचा समावेश आहे. स्पर्धेत चौथ्या स्थानी असणाऱ्या भारताच्या पुरुष संघाच्या रविवारी सातव्या, आठव्या आणि नवव्या फेरीच्या लढती होणार आहेत.