पश्चिम विभागीय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेवर महाराष्ट्राचा दबदबा राहिला. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने पूर्वार्धातील १४-२० अशा पिछाडीवरून जोरदार खेळ करत राजस्थानला ४३-२४ असे हरवित विजेतेपद पटकाविले. महिलांमध्ये महाराष्ट्राने विदर्भचा ४२-५ असा धुव्वा उडवत विजेतेपदावर मोहोर उमटवली.
महाराष्ट्राचे खेळाडू पुरुष गटात सहज विजेतेपद मिळवतील, ही चाहत्यांची अपेक्षा राजस्थानच्या खेळाडूंनी खोटी ठरविली. वजीर सिंग आणि जसबीर सिंग यांच्या आक्रमक चढायांच्या जोरावर राजस्थानने पूर्वार्धात २०-१४ अशी आघाडी घेतली. तेव्हा महाराष्ट्राच्या खेळाडूंवर कमालीचे दडपण आले होते. शशांक देवडिगा व काशिलिंग आडके यांनी उत्तरार्धात खोलवर चढाया करत महाराष्ट्राच्या खात्यात गुणांची भर घातली. त्यामुळेच महाराष्ट्राला विजेतेपद मिळविण्यात यश मिळाले.
महिलांच्या अंतिम सामन्यात, दीपिका जोसेफ, अभिलाषा म्हात्रे, स्नेहल साळुंके व अरुणा सावंत यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर महाराष्ट्राने पूर्वार्धात २३-३ अशी भक्कम आघाडी घेतली होती. पूर्वार्धात त्यांनी प्रतिस्पध्र्यावर दोन लोण चढवत विजय निश्चित केला होता. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलेल्या वेगवान खेळापुढे विदर्भच्या खेळाडूंचा बचाव निष्प्रभ ठरला. पकडी व चढाया या दोन्ही आघाडय़ांवर विदर्भच्या खेळाडूंनी साफ निराशा केली. त्यांच्या गौरी वाडेकर व नितू चौधरी यांचा अपवाद वगळता अन्य खेळाडू अपयशी ठरल्या. उपांत्य लढतीत महाराष्ट्राने छत्तीसगढ संघावर ४४-२५ अशी मात केली तर विदर्भ संघाने मध्य प्रदेशवर ३१-२७ असा निसटता विजय नोंदविला.
पुरुष गटात महाराष्ट्राने उपांत्य फेरीत विदर्भचे आव्हान ४७-१५ असे लीलया परतवून लावले. त्या वेळी विजयी संघाकडून सतीश खांबे व सचिन शिंगाडे यांनी उल्लेखनीय खेळ केला होता.