वेस्ट इंडिजविरूद्धच्या तिसऱ्या वनडेत टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने आपल्या नावे एक विक्रम नोंदवला आहे. विंडिजविरूद्धच्या तिसऱ्या वनडेत त्याने ७८ धावांच्या खेळी दरम्यान माजी कर्णधार अझरूद्दीनला मागे टाकले.

विंडिजविरूद्धच्या मालिकेत भारताने २-० ने आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना चार गड्यांच्या बदल्यात २५१ धावा केल्या. उत्तरादाखल विंडिजची संपूर्ण टीम ३८.१ षटकांत १५८ धावांवर संपुष्टात आली. भारताने ९३ धावांनी हा सामना जिंकला. पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. तर दुसरी वनडे भारताने १०५ धावांच्या फरकाने जिंकली होती. भारताच्या या विजयात धोनीने आपल्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. विंडिजविरोधात ७८ धावांची विजयी खेळी करत त्याने माजी कर्णधार अझरूद्दीनला मागे टाकले.

धोनी आता वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडुंत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. त्याने अझहरला मागे टाकले आहे. अझहरने ३३४ वनडे सामन्यांत ३०८ डावांमध्ये ३६.९२ सरासरीने ९३७८ धावा बनवल्या आहेत.

धोनीने आतापर्यंत २९४ सामन्यातील २५४ डावांत ५१.३१ च्या सरासरीने ९४४२ धावा कुटल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट हा ८९.१४ आहे. धोनी आता सचिन तेंडुलकर (१८४२६), सौरभ गांगुली (११२२१) आणि राहुल द्रविड (१०७६८) यांच्या मागे आहे.

नाबादमध्येही पुढे
इतकंच नव्हे तर वनडेमध्ये तो आता ७० वेळा नाबाद राहिलेला आहे. यामध्ये केवळ दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार शॉन पोलॅक आणि श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वास हेच पुढे आहेत. दोघेही वनडे सामन्यात ७२ वेळा नाबाद राहिले आहेत. तो विक्रमही धोनी लवकरच आपल्या नावे करू शकतो.