मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगला विश्वास
आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करता आलेली नाही. मुंबईचा संघ गतविजेता असला तरी त्यांना गेल्या मोसमातील पहिल्या सहा सामन्यांमध्ये फक्त एकच सामना जिंकता आला होता. यावेळी तर त्यांचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा दुखापतीमुळे पहिल्या मोसमात खेळणार नाही, पण तरीही मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला चांगल्या सुरुवातीची आशा आहे, तर दुसरीकडे मुंबईचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने मलिंगाची उणीव आम्हाला भासेल असे म्हटले असले तरी त्याची जागा आम्ही भरून काढू, असे म्हटले आहे.
मलिंगाबाबत पॉन्टिंग म्हणाला, ‘‘गेल्या मोसमातील विजयात मलिंगाचा फार मोठा वाटा होता. त्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली होतीच, पण अखेरच्या षटकांमध्येही त्याने भेदक मारा केला होता. तो या स्पर्धेच्या पहिल्या मोसमात खेळणार नाही, पण त्याची जागा घेणारे उपयुक्त गोलंदाज संघात आहेत.’’
मलिंगाने गेल्या मोसमातील १५ सामन्यांमध्ये २४ बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. पण ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला श्रीलंकेचे कर्णधारपद सोडावे लागले होते.
‘‘ गेल्या दोन मोसमांमध्ये पाहिले तर संघाला चांगली सुरुवात करता आलेली नाही. चांगली सुरुवात झाली की मनोबल वाढते आणि त्याचा फायदा संघाला होत असतो. त्यामुळे यावेळी चांगली सुरुवात करून आयपीएलचा चषक कायम राखू,’’ असे रोहित म्हणाला.
रोहितच्या फॉर्मची चिंता नाही – पॉन्टिंग
आशिया चषक आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत रोहितला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. याबद्दल विचारले असता पॉन्टिंग म्हणाला की, ‘‘ रोहित हा क्रिकेट जगतातील काही अव्वल फलंदाजांपैकी एक आहे. बऱ्याच कालावधीपासून त्याने चांगली कामगिरी केली आहे. क्रिकेटमध्ये चढ-उतार येतच असतात. पण यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्याकडून अद्वितीय कामगिरी पाहायला मिळेल, हा मला विश्वास आहे. त्यामुळे त्याच्या फॉर्मची चिंता मला नक्कीच नाही.’’
‘‘ ट्वेन्टी-२० विश्वचषकात फिरकीपटू हरभजन सिंगला खेळण्याची संधी मिळाली नाही. पण तो मुंबई इंडियन्सकडून प्रत्येक सामना खेळेल, अशी मला आशा आहे. तो आमच्या संघातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे,’’ असे पॉन्टिंग म्हणाला.

मी सलामीलाच येणार- रोहित
‘‘ आतापर्यंतचा आयपीएलचा इतिहास पाहता एक सलामीवीर म्हणून मी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मी सलामीलाच येणे पसंत करेन. पण संघामध्ये चांगली गुणवत्ता आहे, त्यामुळे संघाच्या गरजेनुसार आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. संघाचे संतुलन राखणेही महत्त्वाचे आहे.’’ असे रोहितने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘दवाचा मुद्दा कळीचा ठरतो. नव्या खेळाडूंना त्याच्याशी जुळवून घ्यावे लागेल. सराव सत्रात आम्ही प्रचंड मेहनत घेत आहोत. कागदावरच्या योजनांची प्रत्यक्ष मैदानावर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे’.