श्रीलंकेचा अनुभवी जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगाने पुन्हा एकदा आपल्या अनुभवाला साजेशी कामगिरी केली आहे. इंग्लंडला विजयासाठी २३३ धावांचं आव्हान दिल्यानंतर मलिंगाने आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. लसिथ मलिंगा विश्वचषक स्पर्धेत ५० बळी घेणारा दुसरा श्रीलंकन गोलंदाज ठरला आहे. याआधी माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने अशी कामगिरी करुन दाखवली आहे. त्याच्या नावावर विश्वचषकात ६८ बळी जमा आहेत.

इतर गोलंदाजांच्या यादीतही मलिगांने चौथं स्थान पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा ७१ बळींसह पहिल्या स्थानावर, पाकिस्तानचा वासिम अक्रम ५५ बळींसह दुसऱ्या स्थानावर तर मुथय्या मुरलीधरन ६८ बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे. मलिंगाने आपल्या सामन्याच्या सुरुवातीलाच जॉनी बेअरस्टो आणि जेम्स विन्स यांना माघारी धाडलं. यानंतर ३१ व्या षटकात मलिंगाने खेळपट्टीवर जम बसवलेल्या जो रुट आणि आक्रमक फलंदाज जोस बटलरला आपल्या जाळ्यात अडकवलं.