लिओनेल मेस्सीच्या शानदार फॉर्मच्या जोरावर बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने दमदार आगेकूच केली आहे. बार्सिलोनाने मँचेस्टर सिटीवर २-० अशी मात केली तर सेंट पॅरिस-जर्मेनने जर्मनीचा क्लब बायर लेवेरक्युसेनचा ४-० असा धुव्वा उडवला.
बार्सिलोना आणि मँचेस्टर सिटी मुकाबल्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमणापेक्षा बचावावर भर दिला. त्यामुळे पहिल्या सत्रात गोलची नोंद झालीच नाही. ५३व्या मिनिटाला सिटीतर्फे खेळणारा डेमिचेलीस आणि बार्सिलोनाचा मेस्सी यांच्यात चेंडूवर ताबा मिळवताना धक्काबुक्की झाली. ‘टीव्ही रिप्ले’नुसार पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर हा प्रकार घडला होता, मात्र सामनाधिकाऱ्यांनी बार्सिलोनाला पेनल्टी कॉर्नर बहाल केला आणि डेमिचेलीसला यलो कार्डही दाखवले. या संधीचा तात्काळ फायदा उठवत मेस्सीने बार्सिलोनाचे खाते उघडले. यानंतर चेंडूवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही संघांमध्ये जोरदार मुकाबला रंगला. बरोबरी करण्याची संधी सिटीच्या खेळाडूंनी चुकीच्या फटक्यांमुळे वाया घालवली. शेवटच्या मिनिटाला डॅनी अल्वेसने गोल करत बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
गेल्या वर्षी चॅम्पियन्स लीग स्पर्धेत बार्सिलोनाने पॅरिस सेंट-जर्मेनचे आव्हान संपुष्टात आणले होते. यंदा मात्र या संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करत आगेकूच केली आहे. सेंट पॅरिसतर्फे ब्लेइस मैतुडीने तिसऱ्याच मिनिटाला गोल केला. ३९व्या मिनिटाला लाटान इब्राहिमोव्हिकने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केला. तीनच मिनिटात त्याने सुरेख गोल करत सेंट पॅरिसची आघाडी बळकट केली. सामना संपायला दोन मिनिटे असताना संघात नुकताच समाविष्ट करण्यात आलेल्या योहान कॅबयेने गोल करत सेंट पॅरिसला विजय मिळवून दिला. बायर लेवेरक्युसेन संघाच्या कमकुवत बचावाचा फायदा उठवत सेंट पॅरिसने दमदार विजयाची नोंद केली.