मँचेस्टर सिटीचे जेतेपद जवळपास निश्चित

मँचेस्टर सिटीने शनिवारी मध्यरात्री क्रिस्टल पॅलेसचा २-० असा पाडाव करत इंग्लिश प्रीमियर लीगच्या जेतेपदावर नाव कोरण्याच्या दिशेने कूच केली. या विजयासह मँचेस्टर सिटीने ८० गुणांसह १३ गुणांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे रविवारी मँचेस्टर युनायटेड (६७ गुण) आणि लिव्हरपूल यांच्यात होणाऱ्या सामन्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मँचेस्टर युनायटेडला हा सामना जिंकता आला नाही तर मँचेस्टर सिटीचे जेतेपद निश्चित होईल. पण मँचेस्टर युनायटेडने विजय साकारल्यास, सिटीला जेतेपदासाठी पुढील सामन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

इंटर मिलानची जेतेपदाकडे वाटचाल

इंटर मिलानने क्रोटोनला २-० असे हरवत सेरी-ए फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदाकडे वाटचाल केली आहे. इंटर मिलानने  दुसऱ्या क्रमांकावरील एसी मिलानला (६९ गुण) तब्बल १३ गुणांनी मागे टाकत ३४ सामन्यांत ८२ गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे. पुढील सामन्यात जेतेपदाचा फैसला होण्याची शक्यता आहे. एसी मिलानने बेनेव्हेंटोवर २-० अशी मात करत तूर्तास तरी जेतेपदाची रंगत कायम राखली आहे.