नवी दिल्ली : राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांनी सामनानिश्चितीचा प्रस्ताव मार्चमध्येच आपल्यासमोर ठेवला होता. याची त्वरित तक्रोर न केल्याचा भारतीय टेबल टेनिस महासंघाचा दावा भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्राने फेटाळला आहे.

मनिकाने सौम्यदीप यांच्यावर टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीदरम्यान सामनानिश्चितीच्या प्रस्तावाचा आरोप केला होता. मार्च महिन्यात झालेल्या पात्रता स्पर्धेत सौम्यदीप यांनी त्यांच्या वैयक्तिक मार्गदर्शन केंद्रातील खेळाडूने ऑलिम्पिकसाठी पात्र व्हावे, यासाठी मला जाणूनबुजून पराभूत होण्याची विनंती केल्याचे मनिका म्हणाली होती. परंतु, तिने याबाबतची माहिती आम्हाला याआधी दिली नसल्याचे भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सचिव अरुण बॅनर्जी यांनी सांगितले. त्यांच्या विधानाचे प्रत्युत्तर देताना प्रशिक्षकांच्या मुद्दय़ावरून टेबल टेनिस महासंघ माझ्यावर खोटेनाटे आरोप करत असल्याचे आता मनिकाने म्हटले.

भारतीय टेबल टेनिस महासंघाने मला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. याचे उत्तर देताना मी राष्ट्रीय प्रशिक्षकांच्या सामनानिश्चितीच्या प्रस्तावाची माहिती बऱ्याच काळापूर्वी (मार्चमध्ये) महासंघाला दिल्याचे स्पष्ट केले. मात्र, आता पाच महिन्यांनंतर मी माहिती न दिल्याचे खोटेनाटे आरोप माझ्यावर का केले जात आहेत, हे मला कळले नाही, असे मनिका म्हणाली.