ऑलिम्पिक पात्रता निवड चाचणी बॉक्सिंग

नवी दिल्ली : सहा वेळा जागतिक विजेती एम. सी. मेरी कोम आणि माजी कनिष्ठ विश्वविजेती निखत झरीन यांच्यातील बहुचर्चित बॉक्सिंग लढत शनिवारी होणार आहे. ५१ किलो वजनी गटात मेरी आणि निखत दोघींनीही पहिल्या फेरीचे सामने आरामात जिंकत ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या निवड चाचणीची शुक्रवारी अंतिम फेरी गाठली.

बल्गेरियाला झालेल्या स्ट्रँडजा स्मृती बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या निखतने दोन दिवसांच्या निवड चाचणीतील पहिल्या दिवशी निर्विवाद विजयाची नोंद केली. निखातने राष्ट्रीय विजेत्या ज्योती गुलियाला १०-० असे नामोहरम केले, तर मेरी कोमने रितू ग्रेवालचा १०-० असा पराभव केला. भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या निवड प्रक्रियेवर टीका करीत मेरी कोमविरुद्ध लढतीचे आव्हान करणाऱ्या निखतने काही आठवडय़ांपूर्वी लक्ष वेधून घेतले होते. अन्य लढतींमध्ये जागतिक युवा सुवर्णपदक विजेत्या साक्षीने ५७ किलो वजनी गटात आशियाई रौप्यपदक विजेत्या मनीषा मौनचा ७-३ असा पराभव केला, तर सोनिया लाथेरने सोनिया चहलला ७-३ असे नमवले.

६० किलो गटात माजी राष्ट्रीय विजेत्या सिम्रनजीत कौरने पवित्राला १०-० असे नामोहरम केले, तर सरिता देवीने साक्षी चोप्रावर ९-१ असा विजय मिळवला. ६९ किलो गटात ललिताकडून मीना राणीचा ९-१ असा पराभव झाला, तर लव्हलिना बोर्गोहेनने अंजलीचा १०-० असा धुव्वा उडवला. ७५ किलो गटात पूजा राणीने इंद्रजावर १०-० असा दिमाखदार विजय मिळवला, तर नुपूरने सविताचा ९-१ असा पराभव केला.

ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात चीन येथे होणार आहे. ५१ किलो, ५७ किलो, ६० किलो, ६९ किलो आणि ७५ किलो वजनी गटात कोणत्याही खेळाडूला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी न गाठता आली नाही. त्यामुळे या पाचही वजनी गटांसाठी निवड चाचणी घेण्यात आली आहे.

महिलांचे अंतिम सामने

५१ किलो गट

एमसी मेरी कोम वि. निखात झरीन

५७ किलो गट

साक्षी मलिक वि. सोनिया लाथेर

६० किलो गट

एल. सरिता देवी वि. सिम्रनजीत कौर

६९ किलो गट

ललिता वि. लव्हलिना बोर्गोहेन

७५ किलो गट

पूजा राणी वि. नुपूर