यंदाच्या युरो चषक फुटबॉल स्पध्रेमागे लागलेले दुष्टचक्र काही केल्या पिच्छा सोडण्याचे नाव घेत नाही. सीन नदीला आलेला पूर, पुरामुळे उद्ध्वस्त झालेले जनजीवन, सरकारविरोधात सुरू असलेले आंदोलन, या आव्हानांमध्ये भर म्हणून या स्पध्रेत दशहतवादी हल्ला करण्याचा कट केला जात असल्याचे समोर आले आहे.

गेल्या महिन्यात युक्रेनच्या सुरक्षा दलाने अटक केलेल्या संशयित दहशतवाद्याकडून ही माहिती उघड झाली आहे. मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा घेऊन युरो स्पध्रेवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. फ्रान्समधील प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार ग्रेगोरे म्युटॉक्स असे या दहशतवाद्याचे नाव असून त्याला युक्रेनच्या सीमेवर अटक करण्यात आली.

गुप्तचर विभागाचे प्रमुख व्हॅसली हॅरित्सॅक यांनी सांगितले की, ‘एकूण १५ ठिकाणी हल्ले करण्याचा त्या इसमाचा कट होता. त्याच्याकडून पिस्तूल, स्फोट घडवून आणणारे पदार्थ आणि १२५ किलो स्फोटके जप्त करण्यात आली.’