माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा इशारा

मयंक अगरवालने अल्पावधीतच द्विशतकांचा सपाटा लावल्यामुळे आगामी सामन्यांमध्ये विरोधी संघातील गोलंदाज त्याच्या कमकुवत बाजूंचा सखोल अभ्यास करतील, असा इशारा भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी दिला आहे.

‘‘मयंक सध्या कारकीर्दीतील सर्वोत्तम फॉर्मात असून भविष्यात तो यशाची आणखी शिखरे सर करेल. परंतु आता त्याच्याविरुद्ध प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज अधिक तयारीनिशी मैदातान उतरतील, त्यामुळे मयंकनेही तितक्याच जोमाने सराव करावा,’’ असे गावस्कर म्हणाले.

‘‘स्ट्रेट ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह यांसारखे फटके खेळताना मयंक डगमगत नाही. त्याचप्रमाणे फिरकीपटूंची तो मनाप्रमाणे कधीही धुलाई करू शकतो, फक्त त्याने उसळत्या चेंडूंना अधिक सक्षमपणे सामोरे जावे,’’ असेही ७० वर्षीय गावस्कर यांनी सांगितले.