टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकल्यानंतर गेल्या सहा दिवसांचा भारताचा ‘पदकदुष्काळ’ शुक्रवारी सातव्या दिवशी बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने संपुष्टात आणला. महिलांच्या ६९ किलो वजनी गटात तिने पदकाची निश्चिती करीत भारतीयांना सुखद धक्का दिला. याशिवाय पी. व्ही. सिंधूने अकाने यामागुचीला नमवून बॅडमिंटनमध्ये उपांत्य फेरी गाठली, तर पुरुष आणि महिला दोन्ही हॉकी संघांनीही विजय नोंदवले. नेमबाज मनू भाकर, राही सरनोबत, तिरंदाज दीपिका कुमारी आणि अ‍ॅथलेटिक्सपटूंनी मात्र निराशा केली.

चेनला नमवून बॉक्सिंगच्या उपांत्य फेरीत स्थान

पीटीआय, टोक्यो

पदार्पणवीर लव्हलिना बोर्गोहेनने (६९ किलो) टोक्यो ऑलिम्पिक बॉक्सिंगमधील भारताच्या पहिल्या पदकाची निश्चिती केली. शुक्रवारी लव्हलिनाने चायनीज तैपेईच्या माजी विश्वविजेत्या नीन-शिन चेनला नामोहरम केले.

आसामची २३ वर्षीय बॉक्सिंगपटू लव्हलिनाने उपांत्यपूर्व सामन्यात चेनचा ४-१ असा पराभव केला. ४ जुलैला होणाऱ्या उपांत्य सामन्यात तिची टर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीशी गाठ पडणार आहे. बुसेनाझने उपांत्यपूर्व सामन्यात युक्रेनच्या अ‍ॅन लायसेन्कोला हरवले.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धामधील दोन कांस्यपदके खात्यावर असणारी लव्हलिना ही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली आसामची पहिली महिला बॉक्सिंगपटू आहे. उपांत्यपूर्व सामन्यात चेहऱ्यावर संयमी भाव राखत चेनला पराभूत केले. लव्हलिनाने आक्रमक सुरुवात केली. त्यानंतर उत्तम प्रतिहल्ला केला. त्यानंतर अंतिम तीन मिनिटांत आत्मविश्वासाने बचाव सांभाळला.

गेल्या वर्षी आपल्या आजारी आईला पाहण्यासाठी लव्हलिना शिबिरातून घरी परतली, तेव्हा तिला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे युरोपमधील विशेष सराव शिबिराला तिला मुकावे लागले होते.

लव्हलिनाच्या वडीलांचा छोटासा व्यवसाय आहे, परंतु बहीण किक बॉक्सिंगपटू आहे. तिच्याचमुळे लव्हलिनाने किक बॉक्सिंग खेळायला प्रारंभ केला. भारतीय क्रीडा प्राधिकरणामधील राष्ट्रीय प्रशिक्षक पॅडूम बोरो यांनी तिला बॉक्सिंगकडे वळण्याचा सल्ला दिला. २०१८च्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत तिने पदार्पणातच कांस्यपदक पटकावले, मग पुढील वर्षी आणखी एक कांस्यपदक मिळवले. याशिवाय दोन आशियाई अजिंक्यपद स्पर्धामधील कांस्यपदकेही तिने पटकावली आहेत.

सिमरनजित पराभूत

थायलंडच्या सुदापोर्न सीसाँडीकडून पराभवामुळे सिमरनजित कौरचे ६० किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील आव्हान संपुष्टात आले. सिमरनजितने ०-५ अशी हार पत्करली.

लव्हलिनाने आपल्या उंचीचा फायदा घेत रणनीतीनुसार उत्तम प्रतिहल्ला केला. याआधीच्या लढती चेनविरुद्ध आक्रमक खेळ केल्या लव्हलिना पराभूत झाली होती. त्यामुळे यावेळी आम्ही तिला संयमाचा सल्ला दिला. याचे तिने तंतोतंत पालन केले.

-मोहम्मद अली कमार, भारताचे बॉक्सिंग प्रशिक्षक

चेनविरुद्ध मी चार वेळा हरले होते. त्याचे उट्टे फेडले. तिच्याविरुद्ध निर्भीडपणे मी लढू शकते, हेच मला या सामन्यातून सिद्ध करायचे होते. मी दडपण न बाळगता तणावमुक्त खेळले. कोणतीही योजना किंवा रणनीती आखली नाही. कारण त्याची आवश्यकताच नव्हती. मी तिच्या खेळाचा उत्तम अभ्यास केला होता.

-लव्हलिना बोर्गोहेन