इंग्लंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीस संघातील मतभेद कारणीभूत असल्याचा आरोप खोडसाळपणाचा आहे, असे ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने सांगितले. ३४ वर्षीय क्लार्कने अ‍ॅशेस मालिकेनंतर निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. २० ऑगस्टपासून ओव्हल येथे पाचव्या कसोटीस सुरू होणार आहे.  संघातील दोन वरिष्ठ खेळाडूंमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांमुळे संघातील एकजुटीस तडा गेला आहे त्यामुळेच संघास पराभवास सामोरे जावे लागले, असे वृत्त येथील एका वृत्तपत्राने दिले आहे. या आरोपांचे खंडन करीत क्लार्क म्हणाला, माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोडसाळपणाचे आहेत. खेळाडूंच्या बसमधून प्रवास करण्यास मी नकार दिला व खासगी मोटारीतून प्रवास केला हा आरोप माझी बदनामी करण्यासाठी करण्यात आला आहे. ज्या दिवशी मी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला, त्या दिवशी मला खूप दु:ख झाले. ज्येष्ठ खेळाडू शेन वॉर्न यांनी माझे दु:ख दूर करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांच्याबरोबर मोटारीतून आमच्या हॉटेलमध्ये गेलो याचा अर्थ मी खेळाडूंच्या बसमधून जाण्यास टाळतो असा होत नाही.