मुंबई : माजी विश्वविजेता बॉक्सिंगपटू माइक टायसन यांना अनेक वेळा भारतात आणण्याचे झालेले प्रयास यापूर्वी अपयशी ठरले होते. त्यामागे भारताबाबत काही चुकीचे पूर्वग्रह टायसन यांच्या मनात ठसलेले होते. त्या पूर्वग्रहांचे निराकरण झाल्यानंतर तसेच भारतातील त्यांच्या चाहत्यांचे प्रमाण त्यांना लक्षात आणून दिल्यावर भारतासह ७ मोठय़ा देशांच्या मार्शल आर्ट्सपटूंना प्रोत्साहन देण्यास होकार दर्शवत ते भारतात येण्यास राजी झाल्याचे कुमिते १ लीग स्पर्धेचे आयोजक मोहम्मदअली बुधवानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भारतात २९ सप्टेंबरला वरळीच्या एनएससीआय स्टेडियममध्ये या स्पर्धेचा शुभारंभ माइक टायसन यांच्या उपस्थितीत होणार आहे. यापूर्वीच्या बहुतांश लीगमध्ये वैयक्तिक स्तरावरील सामने व्हायचे किंवा लीगमधील सामन्यांमध्ये एकेका शहरांच्या नावाने असलेल्या संघातून विविध देशांचे खेळाडू सामने खेळायचे. मात्र या लीगमध्ये भारत, चीन, रशिया, अमेरिका, इंग्लंड, पाकिस्तान, बहारिन, संयुक्त अरब अमिराती या आठ देशांचे खेळाडू त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करीत खेळणार आहेत. २९ सप्टेंबरला भारत विरुद्ध अरब अमिराती असा प्रदर्शनीय सामना खेळवला जाणार आहे. जगभरातील या आठ देशांचे प्रेक्षकदेखील लीगला मोठय़ा उत्सुकतेने पाहणार असल्याने या लीगच्या लोकप्रियतेत वर्षांगणिक भर पडेल, असा विश्वासदेखील बुधवानी यांनी व्यक्त केला.

प्रत्येक संघात ९ खेळाडू

सर्व देशांमधून प्रत्येकी ९ खेळाडूंचे संघ सहभागी होणार आहेत. त्यात ८ पुरुष आणि १ महिला खेळाडूचा समावेश असेल. १८ ते ३५ अशी वयोमर्यादा असलेल्या खेळाडूंची निवड करण्यात आली असून भारतीय खेळाडू सध्या बॅँकॉकला विशेष सत्रात सहभागी झाले आहेत. या लढतीत पाच मिनिटांच्या तीन फेऱ्या होणार आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकांना तात्काळ इलेक्ट्रॉनिक फलकावर गुण दिसणार असल्याने प्रेक्षकांची रुची वाढण्यासदेखील मदत होणार असल्याचे बुधवानी यांनी सांगितले.