फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोलांच्या विश्वविक्रमाला गवसणी घालणारा जर्मनीचा अव्वल फुटबॉलपटू मिरोस्लाव्ह क्लोसने फुटबॉलमधून निवृत्ती स्विकारली आहे. ३८ वर्षांच्या मिरोस्लाव्ह क्लोसच्या खात्यात फिफा विश्वचषकात सर्वाधिक १६ गोल्स जमा आहेत. याशिवाय जर्मनीकडून १३७ सामन्यांत सर्वाधिक ७१ गोल झळकावण्याच्या विक्रमाची नोंद देखील क्लोसने केली आहे. दोन वर्षांपूर्वी क्लोसने जर्मनीला विश्वविजेतेपद जिंकून दिल्यानंतर महिन्याभराच्या आत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला होता. त्यानंतर बुधवारी क्लोसने आंतरराष्ट्रीय फुटबॉलसह क्लब फुटबॉलला देखील रामराम केला आहे. ब्राझीलमध्ये रंगलेल्या विश्वचषकाच्या सोहळ्यात जर्मनीने अर्जेटिनाला १-० असे हरवून १९९० नंतर प्रथमच विश्वचषकावर मोहोर उमटवली होती. या विश्वचषकात क्लोसने दोन गोल करून ब्राझीलच्या रोनाल्डोचा सर्वाधिक गोलांचा विश्वविक्रम मोडीत काढून नवा अध्याय रचला.

पोलंडमध्ये जन्मलेल्या क्लोसने २००१मध्ये जर्मनीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. सलग चार विश्वचषकांत गोल करणारा तो पेले, उवे सीलेर यांच्यानंतरचा तिसरा फुटबॉलपटू ठरला आहे. त्याचबरोबर उपांत्य फेरीत ब्राझीलविरुद्धच्या सामन्यात ७-१ असा विजय मिळवून संघाच्या विजयात योगदान देणाऱ्या क्लोसने रोनाल्डोचा १५ गोलांचा विश्वविक्रम मागे टाकला. २००२च्या विश्वचषकात पाच गोल, मायदेशातील २००६च्या विश्वचषकात पाच गोल, २०१०च्या विश्वचषकात चार गोल आणि २०१४च्या विश्वचषकात दोन गोल करून त्याने १६ गोलांसह विश्वविक्रमाला गवसणी घातली. जर्मनीतर्फे सर्वाधिक १३७ सामने खेळणारा तो लोथार मॅथ्यूज यांच्यानंतरचा दुसरा फुटबॉलपटू ठरला आहे.