ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा गेली अनेक वष्रे समर्थपणे सांभाळणाऱ्या मिचेल जॉन्सनने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर क्रिकेटजगताला अलविदा केला. क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे, याची जाणीव झाल्यामुळे मी निर्णय घेतला, असे ३४ वर्षीय जॉन्सनने सांगितले. पर्थच्या ‘वाका’ मैदानावर २००८मध्ये जॉन्सनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६१ धावांत ८ बळी मिळवण्याचा पराक्रम साधला होता. त्याच मैदानावर मंगळवारी पाचव्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ होण्यापूर्वी जॉन्सनने निवेदनाद्वारे निवृत्तीचा निर्णय स्पष्ट केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या निवृत्तीची लाट पसरली आहे. नुकत्याच इंग्लंडविरुद्ध झालेल्या अ‍ॅशेस मालिकेनंतर मायकेल क्लार्क, ब्रॅड हॅडिन, रयान हॅरिस, ख्रिस रॉजर्स आणि शेन वॉटसन यांनी निवृत्ती जाहीर केली. यात आणखी एक दिग्गज क्रिकेटपटू सामील झाला आहे. ‘‘हा प्रवास अतिशय सुखद होता, परंतु त्याचा कुठे तरी शेवट होणे आवश्यक होते. ‘वाका’चे स्टेडियम हे यासाठी मला खास वाटले,’’ असे जॉन्सनने सांगितले.
दुसऱ्या कसोटीला प्रारंभ होण्यापूर्वीच जॉन्सनच्या निवृत्तीची चर्चा रंगली होती. ७३ कसोटी सामन्यांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या जॉन्सनला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात १५७ धावांत फक्त १ बळी मिळवता आला होता. मात्र दुसऱ्या डावात त्याच्या गोलंदाजीचे ६-२-२०-२ असे भेदक पृथक्करण होते.
बराच विचार केल्यानंतर मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारावी, या निर्णयापर्यंत येऊ शकलो, असे जॉन्सनने चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यावरच आपल्या सहकाऱ्यांना सांगितले.
क्विन्सलँडकडून २००१मध्ये प्रथम श्रेणी पदार्पण केल्यानंतर २००७मध्ये जॉन्सनने कसोटी पदार्पण केले. त्याने मग पश्चिम ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. ऑस्ट्रेलियाचे महान वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या जॉन्सनने आयसीसीचा वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कारसुद्धा पटकावला आहे.
‘‘माझ्या कारकीर्दीत मी अनेक चढउतार पाहिले आहेत. माझ्याकडून प्रामाणिकपणे क्रिकेटची सेवा करून सर्व काही प्राप्त केले आहे, याचा मला अभिमान आहे,’’ असे जॉन्सनने सांगितले.
दुखापतीमुळे जॉन्सनच्या कारकीर्दीचे नुकसान झाले. २०१३-१४मध्ये त्याने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १३.९७च्या सरासरीने ३७ बळी मिळवले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ५-० अशा फरकाने अ‍ॅशेसवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करता आले होते.
१५३ एकदिवसीय सामन्यांत २३९ बळी मिळवणाऱ्या जॉन्सनने ३० ट्वेन्टी-२० सामन्यांतही प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये नाबाद १२३ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या असून, त्याच्या खात्यावर ११ अर्धशतके जमा आहेत.

क्रिकेटजगातात नेहमीच खास गोलंदाज म्हणून ओळख असणाऱ्या मिचेल जॉन्सनला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. मुंबई इंडियन्सच्या निमित्ताने त्याला जवळून ओळखण्याची संधी मिळाली. खेळाकडे आक्रमक पद्धतीने पाहण्याचे त्याचे धोरण मला अतिशय भावले.
-सचिन तेंडुलकर

सर्वाधिक बळी घेणारे
ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज
शेन वॉर्न               ७०८
ग्लेन मॅकग्रा         ५६३
डेनिस लिली          ३५५
मिचेल जॉन्सन     ३११