स्वातंत्र्य दिनाचं अभिनंदन करणारा मेसेज ट्विटरवर एक दिवस उशीरा टाकल्यामुळे, ट्रोल करणाऱ्या एका चाहत्याला भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने चांगलचं प्रत्युत्तर दिलं आहे.

मितालीने ट्विट केल्यानंतर मनोज नावाच्या एका युजरने, स्वातंत्र्य दिन संपला, तुमच्या सारख्या सेलिब्रेटीने इतक्या उशीरा मेसेज टाकणे योग्य नाही अशा आशयाचं ट्विट केलं.

मितालीनेही मनोजच्या ट्विटला सडेतोड प्रत्युत्तर देत आपली बाजू स्पष्ट केली.

मिताली राज सध्या इंडिया ब्ल्यू संघाकडून बंगळुरुत महिला चॅलेंजर ट्रॉफी खेळत आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात मितालीने ५१ धावांची खेळी केली. मात्र तिची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. इंडिया रेड संघाने ७ धावांनी हा सामना जिंकला. बीसीसीआयच्या नियमानुसार सामना सुरु असताना ड्रेसिंग रुममध्ये कोणत्याही खेळाडूला फोन वापरण्याची परवानगी नसते. याच कारणामुळे आपल्याला स्वातंत्र्य दिनाचा संदेश लिहीता आला नसल्याचं मितालीने म्हटलं आहे.