मिझारोमने उत्कृष्ट सांघिक खेळ करीत संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत पहिलेच विजेतेपद मिळविले. त्यांनी अंतिम लढतीत रेल्वेचा ३-० असा दणदणीत पराभव केला.
एकतर्फी झालेल्या या सामन्यात मिझोरामने निर्विवाद वर्चस्व गाजविले. त्यांच्या झिको झोरेम्संगा याने दोन गोल करत सिंहाचा वाटा उचलला. एफ. लालरीपुयाने एक गोल करत त्याला चांगली साथ दिली. रेल्वे संघाने यापूर्वी १९६६ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. सिलिगुडीत झालेल्या अंतिम लढतीत त्यांना ४३व्या मिनिटाला गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. मात्र त्यांच्या राजेशकुमार याने हेडरद्वारे मारलेला चेंडू गोलपोस्टच्या बाजूने गेला.