ब्रिटनच्या मो फराहचे विक्रमी दहावे सुवर्ण

कारकीर्दीतील अखेरच्या जागतिक अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत ब्रिटनचा धावपटू मो फराह कशी कामगिरी करतो याची उत्सुकता सर्व जगाला लागली होती. लंडन येथे सुरू असलेल्या जागतिक स्पध्रेच्या पहिल्याच दिवशी अविश्वसनीय कामगिरी करून  जगातील सर्व वृत्तपत्रांच्या मथळ्यात फराहने जागा घेतली.

३४व्या वर्षीही फराहने आपणच सर्वोत्तम धावपटू असल्याचे सिद्ध केले. येथील लंडन स्टेडियमवर त्याचे आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. २०१२च्या ऑलिम्पिक स्पध्रेत याच स्टेडियमवर सुवर्णपदक जिंकण्याच्या आठवणींना उजाळा देताना फराहने १०,००० मीटर शर्यत जिंकण्यासाठी कंबर कसली आणि शर्यतीअंती सर्वाना अपेक्षित असलेला निकाल आला. स्टेडियमवरील त्याचे आगमन आणि त्यानंतर विक्रमी दहावे सुवर्ण जिंकून त्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

केनिया आणि युगांडाच्या धावपटूंनी पहिल्या नऊ किलोमीटर अंतरात ३४ वर्षीय फराहला रोखण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, गतविजेत्या फराहने आपणच येथील दादा असल्याचे सिद्ध करताना सातत्याने आगेकूच केली. अखेरच्या ८०० मीटर अंतरात फराहने आपला वेग वाढवत जागतिक स्पध्रेत १०,००० मीटर शर्यतीत जेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्याने २६ मिनिटे ४९.५१ सेंकदात हे अंतर पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. आयएएएफ जागतिक स्पध्रेतील ही दुसरी सर्वोत्तम जलद वेळ आहे. युगांडाच्या जोशूआ चेप्टेंगेईने २६:५०.६० सेकंदासह रौप्य, तर ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या  केनियाच्या पॉल तानुईने २६:५०.६० सेकंदासह कांस्यपदक जिंकले.

उसेन बोल्ट उपांत्य फेरीत

१०० मीटर शर्यतीतील मक्तेदारी कायम राखण्यासाठी उत्सुक असलेल्या जमैकाच्या उसेन बोल्टने जागतिक मैदानी स्पध्रेत शनिवारी १०० मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. अर्थात बोल्टने पात्रता शर्यतीत निराशाजनक कामगिरी केली. त्याने १०.०७ सेकंदात हे अंतर पूर्ण केले.

द्युती आणि मुहम्मद अनास पहिल्या फेरीतच बाद

भारताची अव्वल धावपटू द्युती चंद आणि मुहम्मद अनास याहिया यांना अनुक्रमे १०० मीटर महिला व ४०० मीटर पुरुष गटाच्या पहिल्या पात्रता फेरीतच अपयश आले. द्युतीने १२.७ सेकंदांची वेळ नोंदवत सहाव्या स्थानावर समाधान मानले. एकूण ४७ धावपटूंमध्ये तिचा ३८वा क्रमांक आला. ‘‘माझ्या शेजारील धावपटूला चुकीच्या सुरुवातीमुळे अपात्र ठरवण्यात आली आणि त्याने मी चिंताग्रस्त झाले. त्या तणावातून मी बाहेर पडू शकले नाही आणि त्यामुळेच चांगली वेळ नोंदवता आली नाही. येथील वातावरणही खूप थंड होते,’’ असे द्युती म्हणाली.

पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीच्या पात्रता फेरीत मुहम्मद अनासने ४५.९८ सेकंदांची वेळ नोंदवली. त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ‘‘मी अव्वल तिघांमध्ये स्थान पटकावू शकलो असतो, परंतु अखेरच्या ३०० मीटर शर्यतीत कमी पडलो. पहिल्या १०० मीटर अंतरात माझा वेग चांगला होता. मात्र, त्यात सातत्य राखण्यात अपयशी ठरलो. आता ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्नशील आहे,’’ असे अनास म्हणाला.

ब्रिटिश म्हणून मला अभिमान वाटतो. हा खूप दीर्घ प्रवास होता आणि तो आत्तापर्यंत अविश्वसनीयच ठरला आहे. पुन्हा जेतेपद पटकावणे अवघड होते, परंतु मी स्वत:ला मानसिकरीत्या सज्ज केले होते. स्पध्रेची सुरुवात करताना भावूक झालो होतो पण मी त्वरित स्वत:ला सावरले.   मो फराह

  • ०७ : जागतिक अजिंक्यपद मैदानी स्पध्रेत पहिल्यांदाच पहिल्या सात धावपटूंनी २७ मिनिटांच्या आत वेळ नोंदवण्याचा पराक्रम केला आहे.
  • ०३ : मो फराहने जागतिक स्पध्रेत १०,००० मीटर शर्यतीत जेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्याने याआधी २०१३च्या मॉस्को आणि २०१५च्या बीजिंग स्पध्रेत सुवर्णपदक जिंकले होते.