करोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ भारतात कोणत्याही प्रकारे क्रिकेट सामने खेळवले गेले नाहीत. मात्र स्पर्धा रद्द होत असल्यामुळे अनेक क्रिकेट बोर्डांचं होणारं आर्थिक नुकसान लक्षात घेता, आयसीसीने स्पर्धा सुरु करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलं. खेळाडूंना सरावासाठी काही विशेष नियमावली आयसीसीने आखून दिली आहे. भारताकडून शार्दुल ठाकूरने काही दिवसांपूर्वी पालघरमधील स्थानिक मैदानावर सरावाला सुरुवात केली.

यानंतर भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीनेही सराव सुरु केला आहे. आपल्या घराजवळील शेतात शमीने फिटनेस कायम राखण्यासाठी धावणं सुरु केलं आहे. याचा व्हिडीओ शमीने सोशल मीडियावर शेअर केलाय.

दरम्यान, आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं आर्थिक नुकसान होणार आहे. यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या काळात या स्पर्धेचं आयोजन करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसीने अद्याप निर्णय घेतलेला नाही. शमी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचं प्रतिनिधीत्व करतो.