वसई-विरार महापौर मॅरेथॉन

प्रसेनजीत इंगळे

सेनादलाच्या मोहित राठोडने २ तास, २४ मिनिट, २२ सेकंद अशी वेळ नोंदवत रविवारी झालेल्या वसई-विरार महापौर मॅरेथॉन शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरले, तर महिलांमध्ये पश्चिम रेल्वेच्या किरण सहदेवने (१ तास, १७ मिनिटे, १५ सेकंद) प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेच्या विविध गटांमध्ये सुमारे १८ हजारांहून अधिक धावपटूंनी भाग घेतला. धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आशियाई मॅरेथॉन विजेता गोपी थोनक्कल उपस्थित होता.

पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी ६ वाजता प्रारंभ झाल्यानंतर प्रमुख धावपटूंमध्ये आघाडी घेण्यात मोहितचा समावेश होता. प्रारंभापासून आघाडीवर असलेल्या मोहितने दोन-तृतीयांश अंतर पार केल्यानंतर एकेका धावपटूला मागे टाकत अव्वल स्थानावर मुसंडी मारली. दुसऱ्या स्थानावरील सुखदेव सिंगने २ तास, ३१ मिनिटे, ४२ सेकंद वेळ नोंदवली, तर धर्मेंदर सिंगने तिसरा क्रमांक पटकावला.

महिलांच्या २१ किमी शर्यतीत पश्चिम रेल्वेच्या किरण सहदेवने (१ तास, १७ मिनिटे, १५ सेकंद) प्रथम क्रमांक आणि कोमल जगदाळेने (१ तास, १८ मिनिट, २४ सेकंद) दुसरा क्रमांक पटकावला, तर नलिनी गुप्ताला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

११ किलोमीटर स्पर्धेत दिनकर लीलके ३६ मिनिटे, ८ सेकंदांत प्रथम आला, तर प्रशांत पुजारीने (४७ मिनिटे, ४४ सेकंद) दुसरा क्रमांक मिळवला. महिलांमध्ये पूजा वर्मा अव्वल आली. तिने ४५ मिनिटे, २७ सेकंदांत स्पर्धा पूर्ण केली. अश्विनी देवरेने दुसरा क्रमांक मिळवताना ५७ मिनिटे, १७ सेकंदांत ही स्पर्धा पूर्ण केली.

पाच किलोमीटरच्या स्पर्धेत संदीप जोयाशी हा प्रथम आला. त्याने १५ मिनिटे, ३२ सेकंदांत ही स्पर्धा पूर्ण केली. राकेश कुमार हा दुसरा आला. त्याने १७ मिनिटे, १२ सेकंदांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली.

ही शर्यत २ मिनिटे, २० सेकंदांत पूर्ण करण्याचे ध्येय मी निश्चित केले होते. परंतु मला वेग योग्य राखता न आल्याने मी लक्ष्य साध्य करू शकलो नाही. परंतु आगामी स्पर्धामध्ये ऑलिम्पिक पात्रतेची वेळ गाठण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.

-मोहित राठोड