भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारतीय संघाला टी-२० विश्वचषक, वन-डे विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकवून देणारा यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख संपूर्ण जगाला आहे. धोनीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०११ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर श्रीलंकेवर मात करत २८ वर्षांनी विश्वचषक जिंकला. ICCच्या तिनही स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारादेखील धोनी एकमेव कर्णधार ठरला. तरीदेखील धोनीला कारकिर्दीच्या अखेरपर्यंत एक गोष्ट मात्र जमलीच नाही असे एका माजी खेळाडूने म्हटले आहे.

इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन याने क्रिकेट कनेक्टेड या कार्यक्रमात बोलताना धोनीबद्दलचा एक किस्सा सांगितला. “कसोटी कारकिर्दीत मी धोनीचा पहिला बळी आहे असं त्याचे चाहते नेहमी मला हिणवतात. पण आज मी पुन्हा हे सांगू इच्छितो की धोनी तू मला बाद करू शकला नव्हतास. हे मलाही माहिती आहे आणि तुलाही माहिती आहे. संपूर्ण कारकिर्दीत तुला कधीच मला बाद करता आलं नाही. पण काहीही असो. आता तू निवृत्त झाला आहेस. निवृत्त झालेल्या क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये तुझं स्वागत आहे”, अशा शब्दात पीटरसनने धोनीचा मजेशीर किस्सा सांगितला.

नक्की काय घडलं होतं?

लॉर्ड्सच्या मैदानावर २०११मध्ये इंग्लंड-भारत कसोटी सामना सुरू होता. अनपेक्षितपणे धोनी गोलंदाजी करायला आला आणि त्याने पीटरसनला टाकलेला चेंडू थोडा स्विंग होऊन किपरने झेलला. त्यावेळी धोनी आणि किपर राहुल द्रविडने अपील केल्यावर पंचांनीही त्याला बाद ठरवलं होतं. पण पीटरसनने DRSची मदत घेतली. अल्ट्रा-एज प्रणालीमध्ये पीटरसनच्या बॅटचा चेंडूशी संपर्क झाला नसल्याचे निष्पन्न झाले आणि त्यामुळे त्याला नाबाद ठरवण्यात आले. त्यानंतर धोनीला कसोटी कारकिर्दीत एकही बळी मिळाला नाही.