भारतीय क्रिकेटची धुरा एम.एस.धोनीकडून विराट कोहलीकडे सोपवताना झालेल्या यशस्वी परिवर्तनाचा अभिमान वाटतो असे भारतीय क्रिकेट संघाच्या राष्ट्रीय निवड समितीचे मावळते अध्यक्ष एम.एस.के.प्रसाद यांनी म्हटले आहे. प्रसाद यांच्या अध्यक्षपदाची मुदत या महिन्यात संपणार आहे. भारताचे माजी डावखुरे फिरकी गोलंदाज सुनिल जोशी यांची राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. एमएसके प्रसाद भारतासाठी सहा कसोटी आणि १७ एकदिवसीय सामने खेळले.

“धोनीकडून विराट कोहलीच्या हाती भारतीय संघाचे नेतृत्व गेले. हा यशस्वी परिवर्तनाचा काळ आम्ही पाहिला. त्याबद्दल मी आणि माझे सहकारी अभिमान बाळगू शकतो. माहिचा म्हणजे धोनीचा कर्णधारपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर विराटने त्याची जागा घेतली. हे परिवर्तन सहजतेने व्हावे अशी आमची इच्छा होती. तिन्ही फॉरमॅटमध्ये आम्ही नंबर एकवर पोहोचलो. त्याचे मला सर्वात मोठे समाधान आहे” असे प्रसाद मिड डे ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

वर्ल्डकप २०१९ च्या उपांत्यफेरीत भारताचा पराभव झाल्यानंतर धोनीच्या भविष्याचा विषय ज्या पद्धतीने हाताळला, त्यावरुन सुद्धा निवड समितीवर टीका झाली. त्यावर प्रसाद म्हणाले की, “धोनीची त्याच्या भविष्याबद्दलची भूमिका अगदी स्पष्ट आहे. ती त्याने मला आणि संघ व्यवस्थापनाला सांगितली आहे. ही गोपनीय बाब असल्यामुळे मी त्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. जी काय चर्चा झाली, ती आमच्यातच राहिली पाहिजे. हा एक अलिखित नियम आहे” असे प्रसाद म्हणाले.