भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांबद्दल बोलायचे झाले, तर दोघांचे स्वभाव पूर्णपणे वेगळे आहेत. धोनी कर्णधार म्हणून मैदानावर असताना शांत आणि संयमी असायचा, तर विराटची ओळख अतिशय आक्रमक कर्णधार अशी आहे. दोघांनी भारतीय संघाला अनेक मालिकांमध्ये विजय मिळवून दिले. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर संघाचे नेतृत्व करण्याची संधी विराटला मिळण्यासाठी धोनीनेच मदत केली, असे स्वत: विराटने सांगितले. मात्र असे असले तरी विराटपेक्षा धोनीच गोलंदाजांचा लाडका कर्णधार होता, असे मत भारताच्या माजी फिरकीपटूने व्यक्त केलं.

धोनी आणि विराट हे दोघेही खूप भिन्न प्रकारचे कर्णधार आहेत. विराट हा खूप आक्रमक कर्णधार आहे. तो मैदानावर व्यक्त होताना कधीही लाजत नाही. याऊलट धोनी अतिशय शांत कर्णधार होता. सामन्यात कितीही तणाव असेल, तरीही त्याच्या चेहऱ्यावरील हावभावातून त्याच्या मनात काय विचार सुरू आहे याबद्दल कधीही थांगपत्ता लागत नसे. खरं सांगायचं तर धोनी हा गोलंदाजांचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वामुळे गोलंदाजांना मदत मिळायची. म्हणूनच विराटपेक्षा धोनी गोलंदाजांचा लाडका कर्णधार असल्याचे अनेक जण सांगतात”, असे भारताचे माजी लेग स्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन म्हणाले.

“विराट कोहलीच्या नेतृत्वातही एक वेगळी चमक आहे. त्याचा मैदानातील वावरच खेळाडूंमध्ये ऊर्जा निर्माण करतो. गोलंदाजांसाठी त्याच्या डोक्यात कायम नव्या कल्पना असतात. त्यानुसार तो मैदानावर विविध योजना राबवतो, पण शेवटी सामन्याचा किंवा स्पर्धेचा निकाल महत्त्वाचा असतो”, असे सांगत त्यांनी विराटला कर्णधार म्हणून सुधारणेला वाव असल्याचे भ्रमित केले.