भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिग धोनीचे जाहिरात विश्वातही वर्चस्व राहिले आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नेतृत्वात आणि कामगिरीतही सातत्य दिसून येत नाही. याचाच फटका त्याला बसताना दिसतोय. जगातील आघाडीची शीतपेय कंपनी पेप्सिकोने धोनीबरोबर गेल्या ११ वर्षांपासून असलेला करार संपुष्टात आणला आहे. कंपनीने मात्र टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीशी असलेला करार कायम ठेवला आहे.
गेल्या ११ वर्षांपासून धोनी पेप्सी आणि लेज चिप्सच्या जाहिरातीत दिसून येत होता. २००५ मध्ये पेप्सिकोने धोनीशी करार केला होता. पेप्सीच्या ‘ओह यस अभी’ आणि ‘चेंज द गेम’ या पेप्सीच्या जाहिरात मोहिमेत धोनी दिसला होता. पेप्सिकोच्या जाहिरातीत आणि मार्केटिंगमध्ये आपल्या उत्पादनाला नायक बनवणे हा आमचा उद्देश आहे. जर एखाद्या सेलिब्रटीला ही कल्पना पटली तर त्याच्याबरोबर आम्हाला काम करायला नक्कीच आवडेल, अशी प्रतिक्रिया पेप्सिकोचे उपाध्यक्ष (ब्रीव्हरेज) यांनी दिली.
पेप्सिकोने नेहमी क्रीडा आणि बॉलीवूड जगतातील आघाडीच्या खेळाडूंशी करार केले आहेत. सध्या त्यांच्याकडे विराट कोहली, रणबीर कपूर आणि परिणिती चोप्रा यासारखे कलाकार व खेळाडू करारबद्ध आहेत. फोर्ब्स मॅगझीनने २०१६मध्ये प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार जाहिरात करारासाठी सर्वाधिक पैसे घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनीने स्थान मिळवले आहे.
धोनी सध्या टीम इंडियाच्या टी-२० व एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. नुकताच अमेरिकेत वेस्टइंडिज विरूद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना धोनीने खेळलेल्या चुकीच्या फटक्यामुळे भारताचा पराभव झाला होता. त्याच्या कामगिरीत सातत्य नसल्याची टीका ही गेल्या काही दिवसांपासून होत आहे.