मनमाड : ताश्कंद येथे आयोजित आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत येथील छत्रे विद्यालयाच्या मुकुंद आहेरने सुवर्णपदक पटकावून नाशिक जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचे नाव वेटलिफ्टिंगमध्येही आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवले आहे.

आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेच्या वतीने आयोजित या स्पर्धेत शुक्रवारी भारतीय संघातून सहभागी झालेल्या छत्रे विद्यालयाच्या मुकुंदने १८९ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा  मुकुंद हा नाशिक जिल्ह्यातील दुसरा वेटलिफ्टिंग खेळाडू ठरला आहे. याआधी मनमाडच्याच निकिता काळेने आशियाई युवा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले होते.

मागील महिन्यात गुवाहाटी येथे ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केल्यानंतर मुकुंदची भारतीय संघात निवड झाली होती. मुकुंदच्या या यशाने संपूर्ण शहरासह छत्रे विद्यालयात आनंदोत्सव सुरू आहे. मुकुंद यास छत्रे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रविण व्यवहारे आणि एनआयएस प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले.