काही वर्षांपूर्वी शिवाजी पार्क  जिमखान्यावर झालेल्या फलंदाजांच्या निवड चाचणीसाठी रांगेत त्याला तासन्तास उभे राहावे लागले होते. परंतु बुधवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पदार्पणातच या वेगवान गोलंदाजाने सर्वाचे लक्ष वेधले. अनेक संकटांवर मात करत मुंबईच्या या युवकाने आपले लक्ष्य साध्य केले आहे.

२५ वर्षीय वेगवान गोलंदाज देशपांडेच्या अप्रतिम कामगिरीमुळे दिल्ली कॅ पिटल्सने बुधवारी राजस्थान रॉयल्सवर १३ धावांनी विजय मिळवला. ‘‘२००७ मध्ये तीन-चार मुलांसह मी शिवाजी पार्क जिमखान्यावर निवड चाचणीसाठी कल्याणहून गेलो होतो. फलंदाजांसाठी भली मोठी रांग लागली होती. जवळपास ४०-४५ खेळाडू रांगेत उभे होते तर २०-२५ जण पॅड बांधून उभे होते. गोलंदाजीसाठी मात्र १५-२० हौशी होते. फलंदाजांची मोठी रांग पाहून मला संधी मिळणार नाही, असाच विचार माझ्या मनात आला. रिकाम्या हाती घरी परतायचे नसल्यामुळे मी गोलंदाजांच्या रांगेत उभा झालो,’’ असे देशपांडेने सांगितले.

‘‘माझ्याकडे नवीन चेंडू आल्यामुळे मी चांगली गोलंदाजी करू शकलो. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही मी निवड चाचणीत अप्रतिम गोलंदाजी केली. पद्माकर शिवलकर आणि संदेश कवळे यांनी आत्मविश्वासाने माझ्याकडे पाहिले आणि शिवाजी पार्क जिमखान्याकडून खेळण्याचा विचार मी पक्का केला. वेगवान गोलंदाज म्हणून मला मिळालेली ती पहिली संधी होती,’’ असे तुषारने सांगितले.

शिवाजी पार्क जिमखान्याचे प्रतिनिधित्व केल्यानंतर २०१६पासून देशपांडे पारसी जिमखान्याकडून खेळत आहे. ‘‘दोन वर्षांपूर्वी किं ग्ज इलेव्हन पंजाबच्या निवड चाचणीला मला जाता आले नाही. रणजी करंडकाचा सामना असल्याने मला निवड चाचणीत सहभागी होता आले नाही. आता दिल्ली कॅपिटल्सकडून संधी मिळाल्याने मी खूश आहे,’’ असेही देशपांडे म्हणाला.